आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक आरोग्य दिन विशेष:राज्याच्या कानाकाेपऱ्यात अडीच महिन्यांत पोहोचवली 80 लाख जणांना काेराेना लस

पुणेएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक
  • राज्याच्या लसीकरण विभागाच्या पुण्यातील केंद्रीय स्टाेेअर रूममधून पुरवठा

पुणे स्टेशननजीक आरोग्य संचालनालयाच्या आवारातील स्टोअर रूममधील फोन सकाळपासूनच खणखणत होता. आैरंगाबादमध्ये रुग्णांची संख्या वाढते आहे, आम्हाला जादा लस मिळेल का?... काेल्हापुरात लसीकरणाचा वेग वाढवायचा आहे, लस वेळेवर उपलब्ध होईल का? नागपूरला एक लाख लसीची गरज आहे, कधीपर्यंत पोहोचेल?

येणारा प्रत्येक फोन घाईचा आणि चिंतेचा. पण या कार्यालयातील डॉ. दिनकर पाटील शांतपणे प्रत्येक फोन अटेंड करून मागणी नोंदवून घेत लसींचे नियोजन करीत प्रत्येकाला दिलासा देण्याचा प्रयत्न करीत होते. हे दृष्य आहे राज्याच्या लसीकरण विभागाच्या केंद्रीय स्टोअररूमचे. आरोग्य सहसंचालक डॉ. पाटील तेथे मागणी आणि पुरवठ्याचे गणित जुळवत नियोजन करीत असतानाच बाहेर तीन व्हॅन्स व्हॅक्सीनच्या प्रतीक्षेत उभ्या होत्या. दोन याच स्टोअरच्या तर तिसरी ठाणे महापालिकेकडून व्हॅक्सीन घेण्यासाठी आलेली. पुण्यातील या व्हॅक्सीन स्टोअरमधून राज्यातील ३४ जिल्हे आणि २७ महानगरपालिकांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस रवाना करण्यात येत आहे.

१८ तासांत गाठले नागपूर
आरोग्य पर्यवेक्षक शेखर आनंदे, चालक संजय बाविस्कर रेफ्रिजरेटर व्हॅनमधून लस मुंबईतून इतर शहरांत पाेहाेचवतात. १७ वर्षांपासून ते बीसीजी, डीपीटी, पाेलिआे, हिपॅटेटिस-बी, राेटा व्हॅक्सीन, मायझेल रुबेला अशा विविध दहा लसी पोहोचवित होते. पण त्यापेक्षा ही जबाबदारी वेगळी आहे. पहिल्याच दिवशी १८ तासांत पुणे ते नागपूर अशा नॉनस्टॉप प्रवासाने त्यांनी लस पोहोचविली.

२ ते ८ डिग्री सेल्सियस तापमान कायम राखण्याचे आव्हान
या संपूर्ण वितरण व्यवस्थेत कूलिंग चेन मेंटेन करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्टोअररूमपासून विभागीय केंद्र आणि तेथून प्रत्यक्ष लसीकरण केंद्रापर्यंत ही लस २ ते ८ डिग्री सेल्सियस तापमानात राखणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी व्हॅक्सीन सेंटरच्या दोन स्वत:च्या रेफ्रिजरेटर व्हॅन्स आहेत. त्याशिवाय कोरोना लसींसाठी त्यांना आणखी एक व्हॅन मिळते आहे. तेथून पुढे प्रत्येक जिल्ह्याला एक रेफ्रिजरेटर व्हॅन, एक वॉकिंग कूलर आणि एक वॉकिंग फ्रीझर देण्यात आला आहे. उत्पादक कंपनी ते लस घेणारी व्यक्ती या पूर्ण प्रवासात ही लस २ ते ८ डिग्री सेल्सियस याच तापमानात ठेवणे बंधनकारक आहे.

लोकांचे जीव वाचवण्याचे समाधान
उन्हाच्या झळा वाढत असताना, कोल्ड चेन डिस्टर्ब न करता कमीत कमी वेळेत, वेगवान पद्धतीने लस पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्या दिवशी फक्त एका चहासाठी थांबून आम्ही थेट नागपूरला लस पोहोचविली आणि तेथील लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिला आणि खूप समाधान मिळाले. ती मंडळी आमची केवढी आतुरतेने वाट बघत होती. लोकांचे जीव वाचवण्याचे समाधान काय असते ते त्या दिवशी अनुभवलं. - शेखर आनंद, आरोग्य पर्यवेक्षक

लसीचा प्रवास हाेताे असा
मुंबई सेंट्रल येथील गव्हर्नमेंट मेडिकल सप्लाय डेपोमध्ये उत्पादक कंपन्यांमधून लस दाखल होते. सिरम इन्स्टिट्यूटमधील लस थेट पुण्यातील स्टोअर हाऊसमध्ये येते. येथून राज्यातील नऊ विभागीय लसीकरण केंद्रांना ती पाठविली जाते. लसीकरणाच्या दृष्टीने आरोग्य विभागाचे पुणे, आैरंगाबाद, लातूर, अकाेला, नागपूर, नाशिक, ठाणे, मुंबई, काेल्हापूर असे नऊ विभाग आहेत. या नऊ सेंटर्समधून त्यांच्या अखत्यारीतील जिल्ह्यांना लस रवाना केली जाते. तेथून तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर डोस पाठविले जातात.

बातम्या आणखी आहेत...