आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • In Dhalewadi Village Of Pune District With A Population Of One And A Half Thousand, Every Family Decided To Donate Organs; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:पुणे जिल्ह्यातील दीड हजार लोकवस्तीच्या धालेवाडी गावात प्रत्येक कुटुंबाने केला अवयवदानाचा संकल्प

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अवयवदानाचा उपक्रम, देशातील पहिलेच गाव

बागायती शेतीत रमून, कृषी क्षेत्रात गुंतलेलं धालेवाडी गाव तसे कुणाच्या फारसं परिचयाचे नाहीच. नाझरे धरणामुळे विस्थापितांचे हे छोटेखानी गाव. वस्ती जेमतेम दीड हजाराची. सकाळी न्याहरी आवरली की सगळे जण शेतावरच्या कामात व्यग्र. संध्याकाळी दमूनभागून आले की कुटुंबीयांसोबत थोडा वेळ घालवून निद्राधीन होणाऱ्या या गावाने नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिवशी एक वेगळीच यशोगाथा लिहिली. १५ ऑगस्ट या दिवशी धालेवाडी गावातल्या प्रत्येक कुटुंबाने मरणोत्तर अवयवदान करण्याचा संकल्प करून, तसे अर्ज ग्रामपंचायतीमार्फत विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्राकडे पाठवले (झेडटीसीसी) आणि इतिहास लिहिला. या एका कृतीने धालेवाडी गाव देशातील अवयवदानाला समर्पित झालेले पहिले गाव ठरले आहे.

धालेवाडी हे गाव पुण्यापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर पुरंदर तालुक्यात जेजुरी या तीर्थस्थळानजीक आहे. गावात तीनशे कुटुंबे आहेत. त्या प्रत्येक कुटुंबाने अवयवदानाचा अर्ज भरला आहे. ही किमया घडवण्यात सर्वात मोठे योगदान आहे, ते ‘सारथी युवा फाउंडेशन’चे अध्यक्ष अनिल खोपडे यांचे आणि पुण्याच्या झेडटीसीसीचे. अनिल खोपडे म्हणाले, अवयवदानाचे महत्त्व मला पूर्ण मान्य असल्याने याच संबंधात समाजजागृती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला काही ठिकाणी तर हा विषय काढला की “भरल्या घरात काय अभद्र बोलताय?’ असे ऐकावे लागले. पण मी निराश झालो नाही.

चिकाटीने अवयवदानाची माहिती, महत्त्व, शास्त्रीय ज्ञान वेगवेगळ्या पद्धतीने सांगत राहिलो. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना हे महत्त्व पटले आणि त्यांच्यापासूनच सुरुवात झाली. दोन महिन्यांच्या अथक परिश्रमांनी हे साध्य झाले. साहिल चव्हाण, आदित्य भांड, चारू काळाणे, रोहित भालेराव, चेतन शेलार या युवा कार्यकर्त्यांनी मदतीचा हात दिला आणि अल्पावधीत आम्ही गावातल्या प्रत्येक घरापर्यंत पोचू शकलो. सरपंच शरद काळाणे, उपसरपंच रोहिदास गायकवाड, ग्रामसेवक रवींद्र पिसे ग्रामपंचायत पदाधिकारी यांनीही साह्य केले आणि घराघरांतून अवयवदानाचा संकल्प केला गेला, असे खोपडे यांनी सांगितले.

अडचणींवर मात
समाजामध्ये अवयवदानाविषयी जागृती निर्माण व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात. मात्र, अनिल खोपडे यांनी अल्पावधीत संपूर्ण गावाला अवयवदानासाठी उद्युक्त केले, हे कौतुकास्पद आहे. त्यांना सुरुवातीला विरोध सहन करावा लागला, याची कल्पना आहे. तांत्रिक अडचणीही होत्या. पण त्यावर मात करून त्यांनी हे यश मिळवले आहे. - आरती गोखले, राज्य समन्वयक - विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र

बातम्या आणखी आहेत...