आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात महामिसळीचे आयोजन:अवघ्या सात तासात पुण्यात बनवण्यात आली विश्वविक्रमी महामिसळ

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून पुण्यात विश्वविक्रमी महामिसळ रविवारी बनवण्यात आली '.सूर्यदत्ता-विष्णू महामिसळ वर्ल्ड रेकॉर्ड २०२१'मध्ये सात तासांत सात हजार किलो मिसळ शिजवण्याचा, तसेच ही तयार झालेली मिसळ तीन तासांत ३०० 'एनजीओ'मार्फ़त ३० हजार गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा विश्वविक्रम झाला. गिनीज, लिम्का, गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्स व अन्य रेकॉर्डमध्ये या विश्वविक्रमाची नोंद होणार आहे. 'सूर्यदत्ता फूड बँक' आणि 'सूर्यदत्ता एज्यु-सोशिओ कनेक्ट'अंतर्गत हा उपक्रम झाला. जगात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्वरूपात मिसळ बनवण्यात आली.

अशी बनली महामिसळ

रविवारी पहाटे २ ते सकाळी ९ या सात तासांच्या वेळेत ही मिसळ तयार करण्यात आली. तर सकाळी ९ ते दुपारी १२ या तीन तासांच्या वेळेत त्याचे वाटप झाले. या महामिसळीसाठी दीड हजार किलो मटकी, ५०० किलो कांदा, १२५ किलो आले, १२५ किलो लसून, ४०० किलो तेल, १८० किलो कांदा-लसूण मसाला, ५० किलो मिरची पावडर, ५० किलो हळद, २५ किलो मीठ, ११५ किलो खोबरे, १५ किलो तेज पान, १२०० किलो मिक्स फरसाण, ४५०० लिटर पाणी, ५० किलो कोथंबीर वापरण्यात आली. त्यातून ही मिसळ झणझणीत, तर्रीदार आणि ठसकेबाज झाली. त्यासाठी ३३ बाय २२ चे चुलवण, १० बाय १० व ७ बाय ७ साईजच्या कढई वापरण्यात आली. त्यामुळे परिसराला भव्यदिव्यतेचे स्वरूप आले होते. "पुणेरी मिसळ पुण्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे महामिसळ तयार करून विश्वविक्रम करावा. या महामिसळच्या माध्यमातून गरजू लोकांना अन्नदान करावे आणि आमच्या संस्थेतील हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए, इंटिरियर डिझाईन, फॅशन डिझाईन आदी विभागाच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने या महामिसळीचे आयोजन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ही महामिसळ तयार झाली. मास्टरशेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या महामिसळीमुळे आमच्या विद्यार्थ्यांना भरपूर ज्ञान मिळाले. " असे 'सूर्यदत्ता'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले. एनजीओमार्फत झालेल्या वाटपासह बावधन परिसर शहरातील इतर भागातील जवळपास ४०० लोकांनी या मिसळीचा आनंद घेतला. सूर्यदत्तामध्ये आलेल्या पाहुण्यांनीही या ठसकेबाज व झणझणीत मिसळीचा आस्वाद घेतला. जगभरातील विविध संस्थांकडून या विश्वविक्रमी महामिसळ उपक्रमाची नोंद घेतली जाणार आहे. "सर्वात मोठा पराठा, पाच हजार किलो खिचडी, चार हजार किलो वांग्याचे भरीत, सर्वात मोठा कबाब असे आजवर अनेक विश्वविक्रम केले आहेत. आज डॉ. संजय चोरडिया यांच्या संकल्पनेतून खवय्या पुणेकरांसाठी महामिसळ बनविण्याचा विश्वविक्रम झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात मिसळ बनवताना खूप मजा आली," अशी भावना मास्टरशेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...