आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विळखा घट्ट:मालेगावात 77, पुण्यात दिवसभरात 43 रुग्ण, रुग्णांची संख्या पोहाेचली 612 वर, मृत्यूदर साडेसहा टक्क्यांवर

पुणेएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
मुंबईत पोलिसांच्या घशाचे स्राव आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतले. - Divya Marathi
मुंबईत पोलिसांच्या घशाचे स्राव आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतले.
  • 51 जणांचा मृत्यू, 48 जणांना रुग्णालयातून घरी साेडले

मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक कहर झाला असून शनिवारी ४३ नवे रुग्ण सापडल्याने अातापर्यंत काेराेना रुग्णांची संख्या ६१२ पर्यंत पाेहोचली अाहे. शनिवारी पुण्यात एकाचा मृत्यू झाला. पुण्यातील मृत्यूदराचा अाकडा १४ टक्क्यांहून साडेसहा टक्क्यांवर अाला अाहे. 

लाॅकडाऊन अाणि संचारबंदी असतानाही काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन, अाराेग्य विभाग अाणि पाेलिस यांच्यावरील ताण वाढत अाहे. गेल्या तीन दिवसांत पुणे शहरातील काेराेनाबाधित अाणि मृत्यूच्या गुणाेत्तरात घट झाल्याची माहिती महापालिका अायुक्त शेखर गायकवाड यांनी दिली अाहे. पुणे शहरात अातापर्यंत काेराेनाचे ५१२ रुग्ण सापडले असून पिंपरी-चिंचवड शहरात ५२ काेराेनाबाधित आढळले. पुणे जिल्ह्यात अातापर्यंत एकूण ४२ काेराेना रुग्ण अाढळले असून काेराेनामुळे पुण्यातील मृतांची संख्या ५१ वर पाेहोचली अाहे. काेराेनाची लागण हाेऊन बरे झाल्याने अातापर्यंत ४८ जणांना रुग्णालयातून घरी साेडण्यात अाले अाहे, अशी माहिती अाराेग्य विभागाने दिली अाहे. 

ससूनमधील डाॅक्टरांना लागण

ससून रुग्णालयात १०० पेक्षा अधिक काेराेना रुग्ण दाखल करण्यात अाले अाहेत. काेराेनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका वरिष्ठ डाॅक्टरांनाच काेराेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना विलग करण्यात अाले अाहे. यापूर्वी अशाच प्रकारे ससूनमधील तीन नर्सेसना काेराेनाची बाधा झाली होती. या डाॅक्टरांकडे ससून रुग्णालयातील जुन्या इमारतीतील काेराेनासाठी राखीव ठेवण्यात अालेल्या वाॅर्डची जबाबदारी हाेती. तसेच नायडू रुग्णालयातही ते रुग्ण तपासणीसाठी जात हाेते. डाॅक्टरांनाच काेराेनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात अालेल्या डाॅक्टर, नर्स, वाॅर्डबाॅय यांना क्वाॅरंटाइन करण्यात अाले अाहे. 

नाशिक : मालेगावमध्ये ७७, जिल्ह्यात एकूण ९१ रुग्ण

कोरोनाचा संसर्ग मालेगावात वेगाने होत असताना काहीसे सुरक्षित वाटत असलेल्या नाशिक शहरात शनिवारी ५ तर मालेगावमध्ये १५ नव्या बाधितांची नोंद झाली. अंबड, संजीवनगर येथील हे असून, मालेगावमधीलही सील केलेल्या पाच भागांतील हे रुग्ण आहेत. त्यामुळे  आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९१ झाली आहे. त्यातील ४ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण बरे झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील पहिला आणि दुसरा कोरोनाबाधित असे दोन्ही रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने काहीसे समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, मालेगावात एकूण रुग्णसंख्या ७७ वर गेली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पण तो ठरलेल्या तालुक्यांत आणि भागातच वाढत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहर, मालेगाव शहर, सिन्नर, चांदवड आणि निफाड या चार तालुक्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.  आधीच बाधा झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील, कुटुंबातील, शेजारील व्यक्तींमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी मालेगावमधील १४ जणांचे तर शनिवारी ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर  चिंता व्यक्त केली जात होती. पण सर्व रुग्ण आधीच्या बाधीत व्यक्तींच्याच संपर्कातील असल्याचे दिसून आले. तर शनिवारीही ज्या ४ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले तेदेखील यापूर्वीच रुग्णांच्या संपर्कातीलच आहेत.

पुणे : पाेलिसासह पत्नीला झाली काेराेनाची लागण

पुण्यातील फरासखाना पाेलिस ठाण्यातील एका पाेलिस कर्मचाऱ्याला अाणि त्याच्या पत्नीला काेराेनाची लागण झाल्याचे उघडकीस अाले अाहे. त्यामुळे पाेलिस दलात खळबळ उडाली आहे. संबंधित पाेलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कात अालेल्या २० ते २५ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयाेगशाळेत पाठवण्यात अाले असून पाच जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात अाले अाहे. 

हा पाेलिस कर्मचारी वाहनचालक असून फरासखाना पाेलिस ठाण्यातील एका वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्याच्या वाहनावर सध्या ताे काम करत असून पिंपरी-चिंचवड शहरातील चऱ्हाेली भागात वास्तव्यास अाहे. पती अाणि पत्नीला काेराेनाची लक्षणे दिसून अाल्याने तपासणीसाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाणि त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात अाले हाेते. दाेघांचे अहवाल पाॅझिटिव्ह अाल्याने पाेलिस दलात खळबळ उडाली असून फरासखाना पाेलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण अाहे. ताे राहत असलेला परिसर अाणि पाेलिस ठाण्याच्या अावारात निर्जंतुकीकरण करण्यात अाले अाहे. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात अालेल्या सर्व लाेकांची माहिती घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सहपाेलिस अायुक्त डाॅ.रवींद्र शिसवे यांनी दिली.

भंडाऱ्यात आयसोलेशन वॉर्डातील दोघांचा सारीने मृत्यू

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू असलेल्या दोघांचा शुक्रवारी रात्री सारीने  मृत्यू झाला. दरम्यान, दोन्ही मृतकांच्या घशातील स्वाबचे नमूने नागपूर येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते.  मृतांत तुमसर तालुक्यातील एक ५० वर्षीय तर दुसरा भंडारा तालुक्यातील ७० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या दोघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात १६ एप्रिलला दाखल केले होते. शुक्रवारी रात्री एकाचा तर दुसऱ्याचा मृत्यू मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास झाला. दरम्यान, कोरोनाचे संकट घोघावत असतानाच दोघांचा सारीने मृत्यू झाल्याने नागरिकांत दहशत आहे. 

अाैषध दुकानदारांनी माहिती द्यावी

काेराेना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे अाढळून अालेल्या व्यक्तींसाठी शासकीय व खासगी दवाखान्यात दाखल हाेणाऱ्यांची संख्या वाढत अाहे. त्यामुळे पुढील काळात काेराेनाची लागण झालेल्यांची संख्या वाढू शकते. या कारणामुळे काेराेनाची साखळी ताेडणे अावश्यक अाहे. त्यामुळे पुणे पाेलिस अायुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील विविध अाैषध विक्री दुकानांत येणाऱ्या वेगवेगळ्या ग्राहकांत सर्दी, ताप, काेरडा खाेकला, श्वसनाचा त्रास या प्रकारची काेराेना विषाणूसदृश लक्षणे दिसून अाल्यास अशा ग्राहकांची नावे अाणि फोन नंबर देण्यास सांगण्यात आले आहे.

नंदुरबार : रुग्णाच्या संपर्कात आल्याने डॉक्टरांसह १५ जण क्वाॅरंटाइन

शहरातील वॉर्ड क्रमांक १० मध्ये ४८ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने त्याच्या कुटुंबातील ६ सदस्यांचे स्वॅब घेण्यात आले. याशिवाय या रुग्णाने ज्या खासगी रुग्णालयात उपचार घेतले तेथील एक डॉक्टर आणि इतर पाच कर्मचारी व अन्य तीन जवळचे नातेवाइक असे एकूण १५ व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांना क्वारंटाइन केले आहे.

आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला.  त्यामुळे जिल्हा प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. कोरोनाबाधित रुग्ण २८ मार्च रोजी गुजरातमध्ये नातेवाइकाच्या डायलिसिससाठी गेला होता. त्यानंतर तो शहरात अनेकांच्या संपर्कात आला. त्याला त्रास जाणवू लागल्यानंतर एका खासगी डॉक्टरकडे त्याने स्वत:ची तपासणी करून घेतली. त्याला कोरोनाचे प्राथमिक लक्षणे दिसून आल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केेल्या आहेत.

नागपूर: कोरोनाबाधितांचा आकडा ६३ वर

उपराजधानी नागपुरात शनिवारी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये आणखी ४ जणांची भर पडल्याने नागपुरातील बाधितांचा आकडा ६३ वर पोहोचला आहे. नागपुरातील सतरंजीपुरा परिसर कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट ठरला असून या परिसरावर प्रशासनाकडून विशेष लक्ष पुरवले जात आहे.  नागपुरातील सतरंजीपुरा परिसरातील आणखी चौघे जण चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी तिघे जण नागपुरात कोरोना संसर्गापायी दगावलेल्या ६८ वर्षीय व्यक्तीचे ते नातेवाईक अाहेत. या सर्वांना यापूर्वीच आमदार निवास येथे विलगीकरणात ठेवले गेले होते. याशिवाय मोमीनपुरा परिसरातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. या चार नव्या प्रकरणांमुळे नागपुरात कोरोना बाधितांचा आकडा ६३ वर पोहोचल्याने नागपूरकरांची चिंता वाढली आहे.

कराड : ३५ वर्षीय तरुण कोराेनामुक्त, एकूण रुग्ण ७

कराड येथे ३५ वर्षीय तरुण कोराेनामुक्त झाला आहे. मुंबईवरून प्रवास करून आलेल्या या ३५ वर्षीय युवकावर कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज मध्ये  कोरोनाबाधित म्हणून उपचार सुरू होते. त्याची १४ व १५ दिवसानंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. यात त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याला शनिवारी घरी सोडण्यात आले. यापूर्वी  एका महिला  रुग्णाचा अहवाल  १४ आणि १५ दिवसानंतर निगेटिव्ह आला होता. त्या महिला रुग्ण पूर्णपणे बऱ्या झाल्याने त्यांना सोडण्यात आले आहे. तसेच २ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता एकूण ७ कोरोनाबाधित जिल्ह्यात असल्याचे सांगण्यात आले. 

सिंधुदुर्ग : अहवाल निगेटिव्ह मात्र आयसोलेशनमध्ये मृत्यू

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णांमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मात्र, त्या रुग्णाचा कोरोना नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.  जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये सध्या ५२ रुग्ण उपचाराखाली असून यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. त्या रुग्णाच्या मृत्यूपूर्वी स्वॅबचा नमुना घेऊन तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आला होता. या रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. आयसोलेशनमध्ये दाखल होतानाच या रुग्णाची प्रकृती गंभीर होती.

सातारा : साताऱ्यात १०१ जणांचे अहवाल निगेटिव्ह

सातारा सातारा जिल्ह्यात वेगळवेगळ्या रुग्णालयांत दाखल असलेल्या १०१ जणांचे कोराेना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे ३, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे १५ व ग्रामीण रुग्णालय, वाई येथे एक अशा एकूण १९ जणांना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. सर्वांच्या घशातील स्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे गडीकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...