आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले:पिंपरी चिंचवडमध्ये बालगुन्हेगार पोलिसांच्या रडारवर, माहिती संकलीत करण्याचे काम सुरु

पुणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड शहरातील बालगुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आले असून पोलिसांकडून या बालगुन्हेगारांची माहिती संकलीत करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. कोणत्या भागातील बालगुन्हेगार कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत, कशासाठी गुन्ह्यामध्ये सहभागी होतात, याची माहिती गोळा करुन पोलिसांकडून या बालगुन्हेगारांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.

गेल्या काही काळात पिंपरी – चिंचवड शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांचा मोठा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. मोबाईल चोरी, चेन स्नॅचिंग, विनयभंग, बलात्कार, खून, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा अशा सर्वच गुन्ह्यांत बाल गुन्हेगारांचे प्रमाण जास्त असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले आहे. गेल्या काही दिवसांत अल्पवयीन मुलांनी खून केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. तसेच शहरातील काही टोळ्या गंभिर गुन्ह्यांसाठी बालगुन्हेगारांचा वापर करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. या पार्श्वभुमीवर आयुक्त अंकूश शिंदे यांनी बालगुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. बालगुन्हेगार गुन्हेगारी क्षेत्राकडे कसे आकर्षित होतात, त्यांना गुन्हे करण्यास कोण प्रवृत्त करतात, त्यांच्या घरची परस्थिती काय आहे, या बालगुन्हेगारांचा कोणकोणत्या गुन्ह्यांत सहभाग आहेत, ते कोणत्या भागात राहतात या सर्व गोष्टींची माहिती संकलित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. ही सर्व माहिती संकलीत करून शहरातील सर्व बालगुन्हेगारांचा एक डेटा तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार या मुलांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.

शाळा का सोडली याचा शोध

बालगुन्हेगारांची माहिती संकलीत करताना पोलिसांकडून या मुलांनी शाळा का सोडली, कितव्या इयत्तेत असताना सोडली, याची माहिती घेण्यात येणार आहे. अनेकदा शाळा सोडल्यानंतर मुले गुन्हेगारीकडे वळताना दिसतात. त्यामुळे या मुलांच्या शिक्षणाची माहिती घेऊन त्यांचे शिक्षण कसे पूर्ण करता येईल, यासाठी विशेष प्रय़त्न करण्यात येणार आहे.

गंभीर गुन्ह्यांमधील बालगुन्हेगारांची संख्या लक्षणीय

शहरात घडणाऱ्या खून, खूनाचा प्रय़त्न, दरोडा, जबरी चोरी अशा गंभिर गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांची संख्या लक्षणीय आहे. अगदी 14 – 15 वर्षांच्या मुलांचा या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले आहे. विधीसंघर्षीत म्हणजे बालगुन्हेगार असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात अडचणी येतात. याचाच फायदा घेत हे गुन्हेगार मोठ मोठे गुन्हे करताना दिसत आहेत.

बातम्या आणखी आहेत...