आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुण्यात वाढत जाणारे कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यूदर पाहता पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढता कामा नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिले. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील आदींसह वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना व करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती जाणून घेतली. या वेळी बोलताना ते म्हणाले, पुण्यात वाढणारे कोरोनाबाधित रुग्ण ही चिंतेची बाब आहे. त्यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल ती आम्ही देण्यास तयार आहोत. पोलिस प्रशासनाने पाहिजे तर कडक धोरण अवलंबावे. त्यासाठी आठ दिवस कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. यासाठी नागरिक निश्चितच सहकार्य करतील. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यासाठी आरोग्यसेवा अत्यंत तत्पर आणि सक्षम करण्यात येईल. शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्राचार्यांना संस्थेत उपस्थित राहण्यासाठी परवानगी देणे आवश्यक आहे, अशी सूचना राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.