आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • In Pune, Needy Corona Patients Do Not Get The Benefit Of Health Scheme, Private Hospitals Charge Exorbitant Bills And Collect Money.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खळबळजनक:पुण्यात गरजू कोरोना रुग्णांना मिळेना आरोग्य योजनेचा लाभ, खासगी रुग्णालयांकडून अवाजवी बिल आकारून पैसेवसुली

मंगेश फल्ले|पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुग्णांना याेजनेचा लाभ देणे बंधनकारक - पुणे विभागीय आयुक्त साैरभ राव

दिवसेंदिवस काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालयात बेड अपुरे पडू लागल्याने अनेकांना खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. मात्र, यादरम्यान म. फुले जन आराेग्य याेजनेच्या दीड लाख रुपयांपर्यंतच्या लाभापासून गरजू वंचित राहत असल्याचे प्रकार समाेर येत आहेत.

खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना अवाजवी बिल आकारून पैसे न भरल्यास त्यांना डांबून ठेवण्यापासून एखादी व्यक्ती मृत झाल्यास त्याचा मृतदेह पैसे भरल्याशिवाय नातेवाइकांच्या ताब्यात न देण्याच्या घटना समोर येत आहेत. यवतमाळ येथून पुण्यात नाेकरीच्या निमित्ताने आलेला मंगल परिहार हा तरुण चालक म्हणून काम करतो. त्याला काेराेनाची लागण झाली. तळेगाव दाभाडे येथे सुरुवातीला काेविड केअर सेंटरमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, त्यास अस्वस्थ वाटू लागल्याने मायमर हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल हाेतानाच त्याने आपली आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने आपणास महात्मा फुले जनआराेग्य याेजनेअंर्तगत उपचार व्हावेत, असे सांगितले. मात्र, ताे बरा झाल्यानंतर रुग्णालयाने त्याला थेट ३६ हजारांचे बिल झाल्याचे सांगत पैसे भरण्यास तगादा लावला.

दुसऱ्या घटनेत लाेणावळा येथील नीळकंठ जाेशी यांना काेराेनाची लागण झाल्याने तळेगावातील मायमर रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. त्यांच्या कुटुंबीयांनी महात्मा फुले जनआराेग्य याेजनेअंतर्गत लाभ मिळावा याकरिता रुग्णालयास सांगितले हाेते. मात्र, ६२ हजार रुपयांचे बिल आकारण्यात आले.

रुग्णांना याेजनेचा लाभ देणे बंधनकारक

पुणे विभागीय आयुक्त साैरभ राव यांनी सांगितले की, महात्मा फुले जनआराेग्य याेजनेचा लाभ काेराेनाग्रस्त रुग्णांना खासगी रुग्णालयांनी देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना सदर याेजनेची माहिती देणे आवश्यक आहे. जी रुग्णालये याेजनेचा लाभ नाकारून अवाजवी बिल आकारणी करत असतील आणि तशा तक्रारी आमच्याकडे आल्या तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.