आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएक अतिशय आनदांची बातमी. रायगड जिल्ह्यातल्या दुर्गम भागातील सह्याद्रीवाडी शाळेची गिर्यारोहण महासंघाने पुनर्बांधणी केली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या तोंडावर हासू फुलले आहे.
दरडींचा धोका
जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूर, ढगफुटी, भूस्खलन सारख्या दुर्दैवी घटना घडल्या. यावेळेस अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या रायगड, पुणे, मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हा गिर्यारोहण संघटना पूरग्रस्त भागांमध्ये मदतकार्य करत होत्या. रायगड जिल्ह्यात घाटमाथ्यावर आणि घाटाखाली अनेक गावांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना समोर आल्या. यातीलच एक होती रायगड जिल्ह्यातील आंबे शिवथर येथील सह्याद्रीवाडी. या दुर्गम वाडीतील काही घरांचे आणि मुख्य म्हणजे तिथल्या शाळेचे प्रचंड नुकसान झाले होते. तसेच त्या शाळेच्या परिसरात दरड कोसळण्याचा धोका होता. त्यामुळे सह्याद्रीवाडीचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन झाले. परंतु तिथले शिक्षक रवींद्र जेधे यांनी ही शाळा जवळच असलेल्या एका झोपडीत भरवण्यास सुरुवात केली. ही बाब महाड येथील मदतकार्य करणाऱ्या सह्याद्रीमित्र संस्थेच्या निदर्शनास आली. लगेचच तेथील शाळेसाठी वर्ग बांधून देण्याचे काम अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने हाती घेतले. सह्याद्रीमित्र संस्थेने या शाळेच्या बांधणीच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी घेतली होती.
जलद बांधकाम
सहा महिन्यात बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रविवारी १२ जून २०२२ रोजी या शाळेचा लोकार्पण सोहळा पार पडला. शाळेचे लोकार्पण चिखलगावचे ज्येष्ठ समाजसेवक व दापोली येथील 'लोकसाधना' सेवा संस्थेचे संस्थापक डॉ. राजाभाऊ दांडेकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्याध्यक्ष हृषिकेश यादव, ज्येष्ठ पदाधिकारी राजन बागवे, किरण देशमुख, राहुल मेश्राम, रायगड जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे अध्यक्ष धनंजय मदन, विश्वेश महाजन, खोपोली येथील यशवंती हायकर्सचे अध्यक्ष पद्माकर गायकवाड, सह्याद्रिमित्र महाडचे डॉ. राहुल वारंगे, शलाका वारंगे, अमोल वारंगे, संकेत शिंदे, भूषण शेठ, गटविकास शिक्षण अधिकारी पालकर मॅडम व या शाळेचे शिक्षक रवींद्र जेधे सर उपस्थित होते.
दानशूरांचे योगदान
आंबे शिवथर येथील ग्रामस्थ, प्रशासकीय अधिकारी आणि महाराष्ट्रातील अनेक दानशूर नागरिकांनी या शाळेच्या उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. पुढील आठवड्यापासून या परिसरात राहणाऱ्या मुलां मुलींची शाळा या नव्याने पुनर्स्थापित सह्याद्रीवाडी जिल्हा परिषद शाळेत भरण्यास सुरुवात होईल. गिर्यारोहकांनी पुढाकार घेऊन सह्याद्रीतील दुर्गम ठिकाणी उभी केलेली ही शाळा शिक्षणाचा दीप तेवत ठेवण्याच्या कामात नेहमीच मदत करेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.