आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री शक्तीला प्रणाम:सातपुड्याच्या घनदाट जंगलात धाडसी जबाबदाऱ्या निभावणाऱ्या वनरागिणी

पुणे / जयश्री बोकीलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सातपुड्याच्या घनदाट पर्वतराजीत, उंच टेकड्यांवर मध्य प्रदेशलगतच्या सीमाभागात पेट्रोलिंग सुरू असताना, अवैध वृक्षतोडीचा मेसेज येतो...आपला चमू घेऊन पेट्रोलिंगच्या कर्तव्यावर असणाऱ्या ‘ती’च्या धाडसाची ती कसोटी असते. वृक्षचोरांच्या मागावर असताना, त्यांच्याकडून अचानक गोफणीतील दगडफेक सुरू होते आणि मग कमरेचे पिस्तूल हातात घेऊन, गोळीबार करायची वेळ येते….प्रसंग ऐकत असतानाही ‘ड्यूटी’वरच्या या रणरागिणीचे वर्णन करायला ‘वनरागिणी’ अशी संज्ञा वापरावी, असे वाटू लागते…

आपल्या राज्याच्या विविध वनक्षेत्रांत अशा अनेक ‘वनरागिणी’ कार्यरत आहेत. विशेषत: वन्यजीव विभागात काम करणाऱ्यांना अधिक जोखीम उचलावी लागते. धाडस, नेतृत्व, निर्णयक्षमता यांचा कस लागतो. अपुऱ्या मनुष्यबळानिशी वृक्षचोर, अतिक्रमण करणारे, शिकारी...यांच्याशी धैर्याने सामना करायचा असतो. त्यामध्ये या वनरागिणी कुठेही कमी पडत नाहीत, हे महत्त्वाचे..

सध्या जळगाव जिल्ह्यातील यावल तसेच शिरपूर (धुळे) येथील वनक्षेत्रात उपविभागीय वनाधिकारी (वन्यजीव) हे जबाबदारीचे आणि फील्डवर्कचे पद सांभाळणाऱ्या अश्विनी बारवकर म्हणाल्या, ‘माझ्याकडे १७५ स्क्वेअर किमी परिसरातील वनक्षेत्र आहे. हा भाग मध्य प्रदेशच्या सीमेलगत आहे. चोरट्या शिकारींचे प्रमाण कमी आहे, पण अवैध वृक्षतोड आणि अतिक्रमणांचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे पेट्रोलिंग सुरू असते. वर सांगितलेल्या प्रसंगांना नेहमीच सामोरे जावे लागते. मात्र महिला म्हणून कुठेच कमी पडत नाही. माझे सहकारी, वरिष्ठ हेही सकारात्मक पद्धतीने काम करणारे आहेत. मी दोन वर्षे डेहराडून येथील वन अकादमीत प्रशिक्षण घेतले. २०१६ पासून प्रत्यक्ष फील्ड वर्क करत आहे. हा आदिवासी भाग आहे. सातपुड्याच्या या जंगलात टेकड्यांच्या आश्रयाने अवैध वृक्षतोडीचा धोका असतो, त्यावर नजर ठेवण्याचे काम असते.’

पुण्यात भोर वनपरिक्षेत्रात उपविभागीय वनाधिकारी असणाऱ्या आशा भोंग भोर, वेल्हा, पुरंदर या तालुक्यांतील वनक्षेत्रात कार्यरत आहेत. त्याही सातत्याने फील्डवर्क करत असल्याने धाडसी प्रसंग सामोरे येतात, असे म्हणाल्या. वनक्षेत्राचे संरक्षण, जतन आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, अशीही जबाबदारी त्या पेलत आहेत.

रूपाली सावंत या नवेगाव नागझिरा व्याघ्रराखीव क्षेत्रात सहायक वनसंरक्षक पदावर कार्यरत आहेत. ‘मी २०१२ पासून वनविभागात आहे. पेट्रोलिंगसाठी सातत्याने जावे लागतेच, पण मला मुळातच वन्यजीवनाची आवड असल्याने, मी जाणीवपूर्वक या क्षेत्रात आले, असे त्या म्हणाल्या. जंगलात अचानक व्याघ्रदर्शनाचे अनेक प्रसंग अनुभवले आहेत.

भंडारा जिल्ह्यात सहायक वनसंरक्षक असणाऱ्या रेश्मा मोरे दहा वर्षांपासून वनविभागात काम करीत आहेत. आधी मी पालघर येथे होते. वनगुन्ह्यांचे काम, सामाजिक वनीकरणाचे काम, संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे काम, रोपवाटिका आणि वनीकरणाची जबाबदारी मी सहकाऱ्यांसह सांभाळते. या निमित्ताने माझा लोकसंपर्क अधिक असतो. लोकांमध्ये वनाविषयी, वन्यजीवांविषयी आस्था निर्माण करणे, पर्यावरणाचे प्रश्न समजून देणे आणि जागृती करणे, अशीही कामे असतात, असे त्या म्हणाल्या.

पुण्याजवळ शिरूर वनपरिक्षेत्रात वनक्षेत्रपाल म्हणून कार्यरत असणाऱ्या तनुजा शेलार यांनी सुरुवातीला औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड येथे काम केले आहे. शिरूर परिसर दुष्काळी भागात येत असल्याने, येथे वनीकरणाच्या मोहिमा प्रामुख्याने राबवल्या जातात. वृक्षारोपणातील वृक्षांचे जगण्याचे प्रमाण ७० टक्के ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. देशी वृक्षांची लागवड करण्यावर भर दिला जातो. जनजागृतीचे काम मोठ्या प्रमाणात आम्ही करतो, असे त्या म्हणाल्या.

वाघिणीची ती गर्जना….
बऱ्याच वेळेला जंगल गस्त करताना आम्हाला जंगलातून आडवेतिडवे फिरावे लागते. असेच एकदा नागझीरच्या जंगलात माझ्यासोबत वनपाल, वनरक्षक तसेच वनमजूर पायदळ गस्त घालत होतो. जंगल पाहणी करत मी एका बाजूने दाट झाडीतून जात होते. अचानक समोर वाघिणीने जोरात गर्जना केली. त्या वेळी मात्र घामाने अंग थरथरू लागले. क्षणाचा विलंब न करता सर्वजण इकडेतिकडे पळाले. दाट झाडीमुळे पुढचे काहीच दिसत नव्हते, पण वाघाचा तो आवाज मात्र कानातून गेलाच नाही. थोड्या वेळाने परत त्याच भागात गस्त करून पाहिले तर आम्हाला वाघाचे पंजे नाल्यामध्ये दिसले आणि सोबत तिच्या पिल्लांचेसुद्धा ठसे दिसले. त्यावरून समजले की ही तर आपल्याच जंगलातील बच्चेवाली वाघीण आहे.

बातम्या आणखी आहेत...