आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकील महिलेविरुद्ध गुन्हा:पुण्यात एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली 8 लाख रुपयांचा घातला गंडा

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील एका व्यक्तीला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका वकील महिलेविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कधी घडली घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शिवाजी पाटील (रा. वानवडी, पुणे) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुग्धा उर्फ मिताली हेमंत कुलकर्णी (वय २८, रा. कल्याण वेस्ट, ठाणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना नोव्हेंबर २०२१ ते मे २०२२ दरम्यान घडली.

वकील असल्याचे सांगितले...

याबाबत माहिती अशी की, शिवाजी पाटील यांची मुलगी बारावी पास झाली आहे. त्यांना त्यांच्या मुलीला डॉक्टर बनवायचे आहे. यासाठी ते प्रयत्नात होते. दरम्यान, पाटील यांची आरोपी मितालीसोबत एका कार्यक्रमात भेट झाली. तिने ती वकील असल्याचे सांगत असिस्टंट जजची परीक्षा पास झाल्याचे सांगिलते. दरम्यान, पाटील यांचा विश्वास तिने संपादन केला. यावेळी पाटील यांनी त्यांच्या मुलीला एमबीबीएसला प्रवेश घ्यायचा आहे, असे सांगितले. या संदर्भात काही मदत होईल का असे विचारले. यानंतर तिने अ‍ॅडमिशनचे काम होईल. त्यासाठी पैसे लागतील असे सांगितले.

उत्तरे देणेही बंद...

आरोपीने पाटील यांच्याकडून 6 लाख 2 हजार रुपये गुगलपे वरून घेतले. यानंतर पुन्हा दोन लाख रुपये पाटील यांच्याकडून उकळले. यानंतर पाटील यांनी मिताली यांना अडॅमिशनबाबत विचारणा केली. मात्र, आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच त्यांच्या फोनला उत्तरे देणेही बंद केले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी थेट वानवडी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...