आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतापजनक!:पुण्यात बागेत खेळणाऱ्या अल्पवयीन मुलींशी अश्लील कृत्य; संशयितावर गुन्हा दाखल

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बागेत खेळणाऱ्या शाळकरी मुलींना मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखवून त्यांचा पाठलाग करणाऱ्या एकाच्या विरोधात खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राहुल लहू कदम (वय 53, रा. पीएमसी कॉलनी वाकडेवाडी, मुंबई-पुणे रस्ता,पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका मुलीच्या वडिलांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशी माहिती पोलिसांनी सोमवारी (12 सप्टेंबर) दिली आहे.

काय आहे प्रकार?

शाळकरी मुलगी आणि तिच्या मैत्रिणी रविवारी बागेत खेळत होत्या. त्यावेळी आरोपी राहुल कदम बागेत थांबला होता. कदमने मुलींचा पाठलाग करुन त्यांना मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखवली. उद्यानात थांबलेले शेखर साठे यांनी हा प्रकार पाहिला. त्यानंतर कदम तेथून पसार झाला. साठे यांनी संशयिताचा पाठलाग केला. दरम्यान, मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी कदमचा शोध घेतला. त्याचा पत्ता शोधून काढला. कदम पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. कदम याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) आणि विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक रेश्मा मावकर या पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.

कोयत्याने वार

ओळखीतील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन एकाने मित्रावर कोयत्याने वार केल्याची घटना कर्वेनगर भागात रविवारी घडली आहे. या प्रकरणी नीलेश श्रीधर ताटे (वय 35, रा. कर्वेनगर,पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विकास सुनील कांबळे (वय 33) याने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास कांबळे याचे ओळखीतील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी ताटेला होता. या कारणावरुन ताटेने कांबळेला शिवीगाळ करून हातावर कोयत्याने वार केला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक एन जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नग्न अवस्थेत घरात शिरला

पुण्यातील दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका कुटुंबात 09 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता सुमारास एक 27 वर्षीय तरुण नग्न अवस्थेत बळजबरीने शिरला. त्याने सदर कुटुंबातील 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच तिच्या 35 वर्षीय वडिलांना शिवीगाळ करत धमकावण्याचा प्रकार केला. त्याचसोबत पीडित मुलीच्या आत्याच्या हातावर कोणत्यातरी वस्तूने मारून तिला जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात आरोपी विनय दत्तात्रय वाघमारे (रा.पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तसाप दत्तवाडी पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...