आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:स्वदेशी उत्पादन, स्वदेशी बाजारपेठ महत्त्वपूर्ण, दुर्गम भागातील उत्पादक, बचत गटांचे उत्पादन थेट ऑनलाइन विक्री : मोदी

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दैनंदिन जीवनात आपण आपल्या घरात अनेक विदेशी वस्तू वापरतो. याबाबत घरातील व्यक्तींनी एकत्रित बसून अशा वस्तूंबाबत यादी बनवली पाहिजे. यातून किती विदेशी वस्तू आपल्या घरात शिरल्या आहेत, ही बाब प्रत्येकाला समजून येईल. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वदेशी बाजारपेठ उपलब्ध झाल्यास नवउद्योजकांना उभारी मिळेल, त्यासाठी स्वदेशी वस्तू वापरण्यावर भर द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दृकश्राव्यप्रणालीद्वारे केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने कात्रज-कोंढवा रस्त्यावर वर्धमान लॉन्ससमोर आयोजित ‘जितो कनेक्ट २०२२’ मध्ये ते बोलत होते. या वेळी केंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी, उद्योजक प्रकाश धारीवाल, नरेंद्र बालडोटा, आमदार माधुरी मिसाळ, उद्योजक हेमंत जैन, पारस भंडारी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जितोची थीम अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला धरून आहे. नुकतेच मी युरोपमधील देशांत भ्रमण करून आलो असून अनेक लोकांशी विकासाबाबत चर्चा केली. जगभरातील भारतीय लोकांमध्ये नवीन विश्वास, आशावाद दिसून येतो आहे. जागतिक शांततेच्या दृष्टीने जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे. वैश्विक कल्याणच्या दृष्टीने भारत पुढे जात असून नवीन भारत हा सर्वांना जोडणारा आहे. बुद्धिमत्ता, तंत्रज्ञानामध्ये आपण पुढे जात असून दररोज अनेक स्टार्टअप नोंदणीकृत होत आहेत. देशातील करव्यवस्था पारदर्शक, ऑनलाइन होत असून ‘वन नेशन, वन टॅक्स’ याबाबतचे लक्ष्य पूर्ण केले जात आहे. उत्पादनांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून सरकारी व्यवस्थेत पारदर्शकता आणली जात आहे. दुर्गम भागातील उत्पादक, बचत गट त्यांचे उत्पादन थेट सरकारला ऑनलाइन विक्री करू शकतात अशी व्यवस्था निर्माण केली. सरकारी पोर्टलवर सुमारे ४० लाख उत्पादकांनी त्यांची नोंदणी केली असून त्यातील १० लाख लोक मागील ५ महिन्यांत जोडले आहे.

‘आत्मनिर्भर भारत’वर भर द्या
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भविष्यात देशाला आत्मनिर्भर भारत दृष्टीने वाटचाल करायची आहे. जितो सदस्यांवर या दृष्टीने महत्त्वपूर्ण जबाबदारी असून युवा जैन समाज यात भरीव कामगिरी करू शकतो. जैन इंटरनॅशनल ट्रेड फाउंडेशनच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे काम समोर येत आहे. शिक्षण, आरोग्य, कल्याणकारी योजना यात जैन संस्थेने नेहमीच भरीव काम करून इतरांना प्रोत्साहित केले आहे. आता समाजाकडून अपेक्षा आहे की, स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहित करून निर्यात उत्पादनाचे नवीन मार्ग शोधून त्यावर काम करावे.

बातम्या आणखी आहेत...