आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुठा नदीकाठी असलेल्या वाकड येथील श्री म्हातोबा मंदिराच्या बाहेर असलेल्या दगडी खांबावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कालखंडातील अप्रकाशित शिलालेखाचा शोध लागला. हा शिलालेख देवनागरी लिपीमध्ये असून मराठी भाषेमध्ये आहे. शहर आणि परिसरातील ग्रामदैवतांचा अभ्यास करणारे संशोधक प्रणव पाटील यांनी या शिलालेखाचा शोध लावला आहे.
या शिलालेखामुळे १७ व्या शतकातील धर्मश्रद्धा आणि लोकदैवते याच्या संशोधनाबरोबरच स्थानिक इतिहास संशोधनावर प्रकाश पडला असल्याचे पाटील यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून पाटील पुणे आणि नजीकच्या गावातील ग्रामदैवतांचा अभ्यास करीत आहेत. त्यासाठी त्यांनी पन्नास गावांचा प्रवास केला आहे. वाकड येथील श्री म्हातोबा या ग्रामदैवताच्या मंदिरात गेले असता त्यांना या शिलालेखाचा शोध लागला.
पाटील म्हणाले, हा शिलालेख मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या दगडी खांबावर आहे. या खांबाला रंग लावण्यात आला होता. मात्र, त्यावर काही तरी लिहिलेले आढळून आले. इतिहासतज्ञाच्या मदतीने या शिलालेखाचा अभ्यास केला तेव्हा या शिलालेखाची अद्यााप कोठेही मांडणी झाली नसल्याचे आढळून आले. शिलालेखामध्ये १६७८ ते १६८१ या कालखंडात मंदिराचे बांधकाम करण्यात आले असल्याचा उल्लेख आहे. त्यावरून शिलालेखाचा काळ १६८१ असा ठरवता येऊ शकतो.
या शिलालेखातील काही अक्षरांचे वळण हे जुन्या पद्धतीचे आहे. ‘र’ हे अक्षर जुन्या वळणाचे आहे. अनेक ठिकाणी ‘ल’ ऐवजी ‘ळ’ अक्षर वापरल्याचे दिसून येते. काही अक्षरांचे वळण प्रमाणबद्ध नाही, तर काही अक्षरे ही अन्य अक्षरांपेक्षा आकाराने मोठी कोरलेली आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
असा आहे शिलालेख
> शिलालेखाची शिळा ३८ सेंटिमीटर उंच,११ सेंटिमीटर रुंद
> यावरील लेखाचा आकार २९ सेंटिमीटर उंच,११ सेंटिमीटर रुंद
> शिलालेख १६ ओळींचा असून त्यापैकी पहिल्या चार ओळी खराब झाल्या आहेत.
> या शिळेवर घट्ट सोनेरी रंग देण्यात आला असून नीट पाहिल्याशिवाय शिलालेख ओळखू येत नाही. या रंगामुळे अक्षरांचे वाचन करणे अवघड जाते.
> शिलालेखामध्ये पाबळ (ता. खेड), धामोनी (ता. खेड), चास (ता. खेड) आर्णि हंजवडी (ता. मुळशी) यासह सहा गावांचा उल्लेख आहे. मात्र, उर्वरित दोन गावांची ओळख पटू शकलेली नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.