आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची बातमी:हुमणी अळीच्या उपद्रवामुळे पिकांचे 30 ते 80 टक्के नुकसान! प्रकाश सापळे लावा आणि प्रादुर्भाव नियंत्रणात आणा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जून महिन्यामध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर हुमणी अळीचे भुंगेरे जेव्हा जमिनीतून बाहेर पडतील त्यावेळी कडूनिंब, बोर, बाभळी यासारख्या झाडाशेजारी प्रकाश सापळे लावून भुंगेरे वेळीच नष्ट केल्यास किडींचा प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भुंगेरे नष्ट करण्याचे काम मोहीम स्वरुपात राबविण्याचे आवाहन पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी शुक्रवारी (ता. 3) केले आहे.

असे पोहचते पिकांना नुकसान

भुंगेरा व अळी हुमणीच्या अळीच्या दोन अवस्था असून भुंगेरा झाडाची पाने खातात, तर अळ्या पिकांची मुळे खातात. अळी अवस्था पिकास अत्यंत हानीकारक आहे. त्यामुळे पीक वाळून जाते.

30 ते 80 टक्के नुकसान

खरीप हंगामात ज्वारी, भात, ऊस इत्यादी पिके तर रब्बी हंगामात गहू, हरभरा इत्यादी पिके घेतली जातात. या पिकांवर हुमणी अळीचा उपद्रव बऱ्याच प्रमाणात वाढ होते. या किडीच्या उपद्रवामुळे साधारणपणे 30 ते 80 टक्के नुकसान होते. शाश्वत पाणीपुरवठयाच्या जमिनीत घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये ओलावा आणि पाणीपुरवठा जास्त होत असल्याने हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे.

नियंत्रणासाठी योग्य कालावधी कोणता?

वळवाचा पहिला पाऊस चांगला झाल्यास सुप्तावस्थेत असलेले भुंगेरे सूर्यास्तानंतर बाभूळ, कडुनिंब, बोर या झाडांवर गोळा होतात. अगोदर मादी भुंगेरे जमिनीतून बाहेर येतात. त्यापाठोपाठ नर भुंगेरे बाहेर पडतात. झाडावर बसून ते पाला खातात. झाडावरच नर-मादीचे मिलन होवून नंतर नर मादी वेगळे होतात आणि पुन्हा झाडाचा पाला खाऊ लागतात. सूर्योदयापूर्वी भुंगेरे परत जमिनीत जावून लपतात. भुंगेरे फक्त रात्रीच्या वेळीच जमिनीतून मिलनासाठी बाहेर पडतात. 2 ते 3 दिवसांनी मादी जमिनीत अंडी घालण्यास सुरूवात करते. हा नियंत्रणासाठी योग्य कालावधी आहे.

तर भुंगेरे नष्ट

पहिला पाऊस झाल्यावर भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, बोर, लिंब या झाडांवर पाने खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावीत व रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून मारावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करावा. त्यामुळे अंडी घालण्यापूर्वीच भुंगे नष्ट होतील. नैसर्गिकरित्या वातावरणातील भुंगेरे, किडे हे प्रकाशाकडे आकर्षित होतात. यास्तव हुमणीचे भुंगेरे आकर्षित करण्यासाठी पिवळा प्रकाश देणारा बल्ब जमिनीपासून सुमारे 3 फूट ऊंचीवर अडकवून ठेवावा. बल्ब अडकवण्यासाठी शेतातील उपलब्ध लाकडी काठ्यांचे तिकाटणे करावे.

कमी खर्चात प्रभावी

बल्बखाली 2 बाय 2 फूट आकाराचा व फूट खोलीचा खड्डा घ्यावा यामध्ये उपलब्ध प्लॅस्टीक कागद टाकून त्यात अर्धा फूट ऊंचीचे रॉकेल मिश्रीत पाणी भरावे. रात्रीच्या संधी प्रकाशात वातावरणातील भुंगेरे या बल्बकडे आकर्षित होतात. बल्बखाली साठविलेल्या रॉकेल मिश्रीत पाण्यात पडून मरण पावतात. हुमणी नियंत्रणाचा हा साधा, सोपा व कमी खर्चीक आणि प्रभावी उपाय आहे.

बातम्या आणखी आहेत...