आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे मेट्रोमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक (17 किमी) आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक (16 किमी) असे 33 किमी लांबीचे 2 मार्ग आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी (7 किमी) आणि वनाझ ते गरवारे (5 किमी) या मार्गांचे उदघाटन 6 मार्च 2022 रोजी पंतप्रधान यांचे हस्ते होऊन तो प्रवाश्यांसाठी खुला करण्यात आला.
आजमितीस पुणे मेट्रोचे 85% काम पूर्ण झाले असून उर्वरित 21 किमी मार्गाची कामे जोमाने सुरु आहेत. काही महिन्यात उर्वरित काम पूर्ण होऊन ते प्रवाश्यांसाठी खुले करण्यात येतील. नुकतेच पुणे मेट्रोने फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते वनाझ अश्या चाचण्या पूर्ण केल्या.
मंगळवारी पुणे मेट्रोच्या रामवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावरील एक महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. या मार्गिकेवरील संगमवाडी रेल्वे क्रोसिंग येथील स्टील गर्डर बसविणेचे अत्यंत महत्वपूर्ण आणि आव्हानात्मक असे काम दोन दिवस प्रयत्न करून पुणे मेट्रोने पूर्ण केले. रेल्वे प्रशासनाकडून मेट्रोच्या कामासाठी दोन्ही दिवस दुपारी या मार्गावरील रेल्वे थांबवून मेट्रोला ब्लॉक देण्यात आला होता. या कालावधीतच मेट्रोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हे आव्हानात्मक काम पूर्ण केले. या मार्गिकेवर बसविण्यात आलेला स्टील गर्डर हा दोन भागांमध्ये बसविण्यात आला. या स्टील गार्डरची एकूण लांबी 45 मीटर असून याच्या एका भागाचे अंदाजे वजन 115 मेट्रिक टन (एकूण अंदाजे वजन 230 मेट्रिक टन) आहे. हा गर्डर बसविण्यासाठी एक्ससीएमजी कंपनीच्या एक्स जी सी400-I या क्रेनचा उपयोग करण्यात आला. या क्रेनची क्षमता 400 मेट्रिक टन इतकी आहे. पुणे मेट्रोमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या क्रेनचा वापर करण्यात आला आहे. मंगळवारी हे दोन्ही स्टील गर्डर मार्गावर लावण्यात आल्यामुळे वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक या मार्गिकेवरील महत्वाचे काम संपले असून येत्या काही दिवसात या मार्गिकेवर ट्रायल रन घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हंटले आहे की, सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रामवाडी स्थानक या मार्गाचे व्हायाडक्तचे काम 90% पूर्ण झाले आहे. येत्या काही महिन्यांत व्हायाडक्तचेकाम पूर्ण होईल. या मार्गावरील मेट्रो स्थानकांचे कामदेखील प्रगतीपथावर आहेत. या मार्गामुळे मेट्रो नेटवर्क पुणे रेल्वे स्थानक, वाडिया कॉलेज चौक, बंडगार्डन, कल्याणी नगर आणि रामवाडी हे उर्वरित मेट्रोला जोडले जातील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.