आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र शासनाच्या ई-नाम योजनेअंतर्गत देशातील बाजार समित्यांशी राज्यातील ११८ बाजार समित्या जोडल्या असून राज्यात इंटरस्टेट व इंटरमंडी ई-ट्रेडची सुरुवात करण्यात आली आहे.ई-नाम अंतर्गत या बाजार समित्यांमध्ये १ हजार ९९४ कोटी रुपये किंमतीच्या एकूण ५१३ लाख क्विंटल शेतमालाची ई-लिलावाद्वारे विक्री झाली आहे.
बाजार समिती अंतर्गत ई-लिलावाद्वारे व्यवहार (इंट्रामंडी), राज्याअंतर्गत दोन बाजार समित्यांमध्ये ई-लिलावाद्वारे व्यवहार (इंटरमंडी) आणि दोन राज्यातील बाजार समित्यांमध्ये ई-लिलावाद्वारे व्यवहार (इंटरस्टेट) अशा तीन स्तरामध्ये ई-नामची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
देशातील १ हजार २६० बाजार समित्या ई-नामला जोडल्या असून राज्यातील ११८ बाजार समित्या ई-नामला जोडल्या आहेत. या बाजार समित्यांमध्ये पहिला स्तर पूर्ण झालेला असून आत्तापर्यंत ई-नामद्वारे सोयाबीन, हरभरा, मका, गहू, ज्वारी, हळद, तूर व उडीद या शेतमालाची प्रामुख्याने विक्री करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये ई-नाम अंतर्गत प्रथमच राज्यातील दोन बाजार समित्यांमध्ये शेतमालाचा ई-लिलावाद्वारे खरेदी-विक्री व्यवहार करून ई-नामची दुसऱ्या स्तरावरील अंमलबजावणी सुरु झाली.
या अंतर्गत राज्यातील सिंगल लायसन्सधारकांद्वारे इंटरमंडी व्यवहार सुरु करण्यात आले आहेत. आतापर्यंत १ लाख ६७२ क्विंटल व ५४ कोटी ६१ लाख किंमतीचे इंटर मंडी व्यवहार झाले आहेत. यामध्ये तूर, चना, मका व सोयाबीन या शेतमालाचा समावेश आहे. अमरावती ॲग्रो फूड्स प्रा.लि., दयाल एनर्जी प्रा. लि., गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट लि., नर्मदा सोलव्हेक्स प्रा.लि. या सिंगल लायसन्स धारकांचा यात प्रामुख्याने समावेश आहे.
ऑक्टोबर २०२२ मध्ये ई-नाम अंतर्गत प्रथमच दोन राज्यातील बाजार समित्यांमध्ये (इंटरस्टेट) शेतमालाचा ई-लिलावाद्वारे खरेदी-विक्री व्यवहार सुरु करीत ई-नामची तिसऱ्या स्तरावरील अंमलबजावणी सुरु झाली. बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीने रेशीम संचालनालय, नागपूर यांच्या मान्यतेने मुख्य यार्ड येथे रेशीम कोश खरेदी विक्रीसाठी केंद्र सुरु केले आहे. या केंद्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, बीड, परभणी, यवतमाळ येथून शेतकरी रेशीम कोश विक्रीसाठी आणतात.
ई-नामद्वारे इंटरस्टेट व्यवहार अंतर्गत रेशीम कोशसाठी देशातील पहिला ई-लिलाव बारामती बाजार समितीमध्ये यशस्वी पार पडला असून ई-नामद्वारे रेशीम कोशाची मोठ्या प्रमाणात केरळ येथील व्यापाऱ्यांद्वारे खरेदी होत आहे. बारामती बाजार समितीमध्ये रेशीम कोश विक्री केंद्र सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांचा चांगला फायदा झाला असून खात्रीशीर कोश विक्रीची व्यवस्था कार्यरत झाली आहे.नाशिक जिल्ह्यात कळवण येथील शेतीश्लोक शेतकरी उत्पादक संस्थेद्वारे देवळा या ई-नाम बाजार समितीमधून झारखंडच्या दिल्ली फ्रेश कंपनीला कांद्याची विक्री करण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.