आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथ पुरस्कार प्रदान:लेखनाला प्रतिसाद मिळवण्याची झालेली घाई वरदान की शाप? ज्येष्ठ हिंदी लेखिका सूर्यबाला यांचा सवाल

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात लेखन करणे जोखमीचे झाले आहे. काय लिहावे आणि का लिहावे असेही प्रश्न उपस्थित झाले आहेत. अभिव्यक्तीसाठी आसुसलेला लेखक आता आपले साहित्य स्वतःच प्रकाशात आणतो. ‘लाइक्स’ आणि ‘कमेेंट्स’च्या काळात लेखनाला प्रतिसाद मिळवण्याची लेखकाला झालेली घाई हे वरदान आहे की शाप, असा सवाल ज्येष्ठ हिंदी लेखिका सूर्यबाला यांनी सोमवारी उपस्थित केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सूर्यबाला यांच्या हस्ते बिशप डाॅ. तामस डाबरे, अर्जुन डांगळे आणि दिलीप प्रभावळकर यांच्यासह विविध लेखकांना वार्षिक ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कार प्रदान करण्यात आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. परिषदेचे अध्यक्ष डाॅ. रावसाहेब कसबे अध्यक्षस्थानी होते. परिषदेचे उपाध्यक्ष राजीव बर्वे, डॉ. तानाजीराव चोरगे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होते.

जुने सारे त्याज्य नाही आणि नवे सारे ग्राह्य नाही. मात्र गांधारीसारखी पट्टी बांधून आम्ही पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आहोत याकडे सूर्यबाला यांनी लक्ष वेधले. आजच्या जमान्यात लेखनही ‘फास्ट फूड’ झाले आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. माझ्या साहित्यकृतींमधील समर्थ स्त्री स्वतःच निर्णय घेते. आक्रस्ताळी विरोध किंवा विद्रोह करत नाही आणि चुकीच्या गोष्टी स्वीकारत नाही, असेही सूर्यबाला यांनी सांगितले.

मी मराठी लेखिका : मराठी बोलता येत नसले तरी समजते. संतसाहित्याची परंपरा असलेल्या मराठीमध्ये माझ्या अनेक पुस्तकांचा अनुवाद झाला आहे याचा मला आनंद आणि अभिमान आहे, अशी भावना सूर्यबाला यांनी व्यक्त केली. हिंदी आणि मराठीची लिपी एकच आहे. त्यामुळे मराठी माझी सख्खी मावशी आहे. माझ्या मराठी अनुवादाला जितक्या वाचकांची पत्रे आली तेवढी मूळ हिंदी कलाकृतींनाही आली नाहीत, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...