आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्या' खुनाचा उलगडा:फक्त 3 हजार रुपयांसाठी संगणक अभियंत्याचा चिरला गळा; मोटारचालकाच्या आवळल्या मुसक्या

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अहमदनगर रस्त्यावरील वाघोलीत मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी झालेल्या संगणक अभियंत्याच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. मोटारचालकाने तीन हजार रुपयांसाठी संगणक अभियंत्याचा गळा चिरुन खून केल्याचे तपासात उघडकीस आले. लोणीकंद पोलिसांनी २४ तासात गुन्हा उघडकीस आणून आरोपी मोटारचालकास अटक केली.

भगवान केंद्रे (वय २३, रा. परतापूर, ता. कळंब, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. गौरव सुरेश उरावी (वय ३५, रा. खराडी, मूळ रा. शिवाजीनगर, अमरावती) असे खून झालेल्या संगणक अभियंता तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी दुपारी लोहगाव-भावडी रस्त्यावरील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली. डोंगराच्या पायथ्याजवळ गौरवची दुचाकी सापडली होती. दुचाकी क्रमांकावरुन पोलिसांनी शोध घेऊन ओळख पटविली होती.. गौरव खराडी येथील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीस होता.खराडी भागातील एका सोसायटीत तो मित्रांसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास गौरव जेवायला जातो, असे मित्रांना सांगून बाहेर पडला. मात्र, तो रात्री उशीरापर्यंत परतला नाही.

लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मारूती पाटील आणि पथकाने तपास सुरू केला. तपासात गौरवचा खून आरोपी भगवान केंद्रे याने केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पाेलिसांच्या पथकाने त्याला कळंब तालुक्यातील परतापूर येथून पकडले.

भगवान पुण्यात ॲप आधारित मोटार चालवत होता. गौरवने ॲपवरुन मोटारीची दोन वेळा नोंदणी केली होती. गौरव आणि भगवान यांची ओळख झाली होती. गौरवने मोटारचालक भगवान याचा मोबाइल क्रमांक घेतलेला होता. गौरव भगवानला तीन हजार रुपये देणे लागत होता.

गौरवने वेळेवर पैसे दिले नसल्याने भगवान त्याच्यावर चिडला होता. शुक्रवारी रात्री भगवानने त्याला बोलावून घेतले. भगवान त्याचा साथीदार आणि गौरव मोटारीतून वाघोलीतील डोंगराच्या पायथ्याशी गेले. तेथे त्यांच्यात वादावादी झाली. भगवान आणि साथीदाराने गौरवच्या गळ्यावर शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले.