आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविरोधी पक्षनेते अजित पवार यांचे मागील २० वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते 'भावी मुख्यमंत्री' असा बोर्ड लावतात मात्र,आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो असा टोला पुणे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत लगावला आहे.
जगदीश मुळीक यांच्या वाढदिवशी भावी खासदार म्हणून बोर्ड झळकले होते. त्यावर त्यांनी मत व्यक्त केले. माझ्या वाढदिनी लावण्यात आलेला बॅनर हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अथवा कार्यकर्त्यांनी लावले नव्हते, तर वेगळ्या व्यक्तीने लावले होते. मात्र, या मुद्द्यावरून मला चुकीच्या पद्धतीने घेरून कुटील पद्धतीने खालच्या पातळीचे राजकारण विरोधकांनी केले.
खासदारकीबाबत चर्चा नाही
मुळीक म्हणाले, नुकतेच खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले असून भाजपकडून कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी खासदारकीबाबत चर्चा केलेली नाही. मात्र, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भाजप पक्षात नसलेल्या एका व्यक्तीने भावी खासदार म्हणून माझा चुकीच्या पद्धतीने बोर्ड लावला. वेगळ्या व्यक्तीने बोर्ड लावणे व त्याची शिक्षा ,जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवर टाकणे ही बाब योग्य नाही. अशाप्रकारे बॅनर लावणे चुकीचे होते मात्र, त्यावरून विरोधकांनी खालच्या पातळीचे राजकारण सुरू केले ते आता थांबवणे गरजेचे आहे.
आ. टिंगरेंवर जोरदार टीकास्त्र
वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी पुणे महापालिका प्रशासनाच्या विरोधात केलेले लाक्षणिक उपोषण म्हणजे त्यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला असेच म्हणावे लागेल असा टोला भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी यावेळी लगावला. मुळीक म्हणाले, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या माध्यमातून विविध विकास कामे आणि प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत. पुणे मेट्रोचे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे. भामा आसखेड पाणी प्रकल्पामुळे या भागातील पाणीपुरवठ्याची समस्या बहुतांश सुटली आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे कामही 70 टक्के पेक्षा अधिक झालेले आहे.
वडगाव शेरीच्या विविध भागात पीपीपी तत्त्वावर रस्ते निर्मितीची कामे सुरू आहेत. नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी गोल्फ चौकात उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून खराडी ते शिरूर उड्डाणपूल निर्मितीच्या कामाला वेग आलेला आहे.
पुणे विमानतळाचे विस्तारीकरण आणि पार्किंग ची सुविधा उपलब्ध होत आहे. मी आमदार असताना प्रस्तावित केलेले लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालय आता अंतिम टप्प्यात आहे. खराडीत पंतप्रधान आवास योजनेचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर टिंगरे यांची निष्क्रियता आणि अकार्यक्षमता मतदारांसमोर आली आहे या भीतीतून त्यांनी लाक्षणिक उपोषणाची स्टंटबाजी केली आहे, असेही ते म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.