आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्यरात्री सव्वाबाराची वेळ...पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश वेशांतर करून जमाल खान पठाण बनले. गालावर दाढी चिकटवून, डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग चढवला होता. तसेच सलवार, पिवळ्या गडद रंगाचा कुर्ता आणि तोंडावर मास्कही होता. तर मियांची बीवी म्हणून सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यादेखील वेशांतर करून त्यांच्यासोबत होत्या. हे दांपत्य टॅक्सीने पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले. एक दांपत्य तक्रार देण्यासाठी आल्यानंतर पोलिस सवयीप्रमाणे तक्रार घेण्यास टाळाटाळ करू लागले. मात्र, काही वेळातच संबंधित पोलिसाची भंबेरी उडाली. कारणही तसेच होते. खुद्द पोलिस आयुक्तच तक्रारदार म्हणून उभे होते. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करून पोलिस ठाण्यांचा आढावा घेतला असता पोलिस ठाण्यात सर्वसामान्य नागरिकांना येणारा कटू अनुभव पोलिस आयुक्तांना अनुभवण्यास मिळाला.
पठाण बनलेल्या पोलिस आयुक्तांनी ठाणे अंमलदाराला सांगितले की, “म्हाडा प्रकल्पात आम्ही राहत असून आमच्या शेजाऱ्याच्या महिलेला रुग्णवाहिका पाहिजे होती म्हणून फोन केला तर चालकाने ८ हजार रुपये सांगितले. ते पैसे खूप मागत असून येण्यासही तयार नाहीत. महिलेची प्रकृती नाजूक आहे, रुग्णवाहिका चालक जास्त पैसे घेऊन लूट करतोय. यावर काहीतरी करा. तुम्हा तक्रार दाखल करून घ्या,’ अशी तक्रार घेऊन ते आले. मात्र, सामान्यांना जसा अनुभव येतो तोच खुद्द पोलिस आयुक्तांनाही आला. “तुम्ही संत तुकारामनगर चौकीत जा, तेथे काय सांगायचे ते सांगा’ असे उत्तर मिळाले. त्यावर इतक्या रात्री कुठे फिरणार येथेच तक्रार दाखल करून घ्या, अशी विनवणी करूनही तक्रार दाखल घेतली नाही. पोलिस आयुक्तांनी मास्क काढल्यानंतर ते पोलिस आयुक्त असल्याचे दिसून आले. हे समजताच संबंधित पोलिसाला अक्षरशः घाम फुटला.
चांगला अनुभव, यापुढेही देणार अशाच अचानक भेटी
पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, ड्यूटीवरील कर्मचारी स्टाफ खरोखर कसे काम करतात, सामान्य नागरिकांशी कसे वागतात, यासाठी अशा प्रकारे वेशांतर करून अचानक भेट दिली. पिंपरीत वाईट अनुभव होता. मात्र, वाकड व हिंजवडीत चांगला अनुभव आला. यापुढेही अशा प्रकारे अचानक भेट देणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.