आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलेबाजी:आमचे सरकार टिकणार नाही हे सांगण्यात भाजपची 4 वर्षे जाणार, जयंत पाटील यांचे चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर

पुणे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमचे सरकार टिकणार नाही हे सांगण्यात भाजपची 4 वर्षे जाणार

भाजपतर्फे पुणे पदवीधर मतदारसंघासाठी संग्रामसिंह देशमुख यांनी बुधवारी अर्ज भरला. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे सरकार आणखी काही वर्षे टिकणार नसल्याचे सांगत महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले होते. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, हे सरकार स्थिर आहे हे चंद्रकांत पाटलांनाही माहीत आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी हे सरकार दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकणार नाही असे सांगितले होते, परंतु आता सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. उरलेली चार वर्षे हे सरकार पूर्ण करेल. हे सरकार टिकणार नाही असे सांगण्यातच भाजप आणि चंद्रकांत पाटलांची चार वर्षे जातील असा टोला त्यांनी लगावला.

पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेले अरुण लाड चांगल्या मतांनी विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. या वेळी जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, अरुण लाड यांनी मागील सहा वर्षांपासून अतिशय समर्थपणे पक्षाचे काम केले आहे. मागील सहा वर्षांच्या काळात त्यांनी लोकसभा असो किंवा विधानसभा असो, पक्षाच्या इतरही कामात पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील एक सहकारी कारखाना त्यांनी अत्यंत उत्तमपणे त्यांनी चालवला आहे. ते स्वच्छ आणि उत्तम चारित्र्याचे उमेदवार आहेत. त्यांना महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांसह इतर मित्र पक्षांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ते चांगल्या मतांनी विजयी होतील असा विश्वास जयंत पाटील यांनी या वेळी बोलताना केला.

निवडणुकीत ‘रयत’ची बंडखोरी
दरम्यान, महायुतीचा घटक असलेल्या सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीत बंडखोरी केली आहे. रयत क्रांतीचे उमेदवार एन. डी. चौगुले यांनी गुरुवारी पुणे पदवीधरसाठी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे सदाभाऊ खोत हे या वेळी त्यांच्यासोबत होते. आपण महायुतीतच आहोत. मात्र, एक स्वतंत्र पक्ष म्हणून ही निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता होती. त्यामुळे हा अर्ज दाखल केल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...