आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणमधील कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई:वीज कनेक्‍शन बंद करण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना जाळ्यात

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंपनीतील विद्युत मीटरचे वीज कनेक्‍शन बंद करण्यासाठी 50 हजार रूपयांची लाच घेताना महावितरण विभागातील कनिष्ठ अभियंताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. अभियंताविरोधात एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरवारी (आज) त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अशी माहिती एसीबीने दिली आहे.

संतोषकुमार बालासाहेब गित्ते असे ताब्यात घेतलेल्या अभियंताचे नाव असून, गित्ते हे भोसरी उपविभाग एक महावितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत आहे. याबाबत 79 वर्षीय तक्रारदाराने लाचलुपचत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांच्या कंपनीतील विद्युत मीटरचे वीज कनेक्‍शन बंद करण्यासाठी तक्रारदाराने महावितरण कार्यालयात अर्ज दाखल केला होता.

या अर्जावार कारवाई करण्यासाठी अभियंत्याने तक्रारदाराकडे 50 हजाराची लाच मागितली. लाच दिल्याशिवाय काम होणार नाही, याची खात्री झाल्यावर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी तिनवेळा करण्यात आली. खात्री पटल्यावर बुधवारी संध्याकळी महावितरण कार्यालय परिसरात सापळा लावला असता, तक्रारदाराकडून पन्नास हजारांची लाच घेताना अभियंता संतोषकुमार गित्ते यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे महावितरण कार्यालयात गोंधळ उडाला असून, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

या प्रकरणी आरोपी संतोष कुमार गीते याच्यावर भोसरी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुण्याचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास लाज लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधितांनी तक्रार करावी असे आव्हान एसीबी पुणे कार्यालयाच्या मार्फत करण्यात आले आहे.याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विरनाथ माने हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...