आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-राष्ट्रवादीचा एक सूर:कसबा, चिंचवड पोटनिवडणूक अटळ; मुख्यमंत्री शिंदे, भाजपचे प्रयत्न फोल, पोटनिवडणूक अटळ

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अटळ असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपने केलेले आवाहन काँग्रेस-राष्ट्रवादीने फेटाळले. कुणाला निवडून द्यायचे ते जनतेला ठरवून द्या, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नाना पटोले यांनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी फोन केले. परंतु महाविकास आघाडी पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम आहे. इकडे नाशिक येथे बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बिनविरोध निवडणूक ही संकल्पना लोकशाहीमध्ये नसल्याचे सांगितले. शिवसेनेची भूमिका जाहीर झाल्यानंतर वंचितची भूमिका स्पष्ट करू, असे ते म्हणाले.

देगलूर, पंढरपूर, कोल्हापूर आठवावे.. तिथे पोटनिवडणुका झाल्या : अजित पवार
पोटनिवडणुका बिनविरोधासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी कोल्हापूर, पंढरपूर, देगलूर आठवावे. तिथे पोटनिवडणुका झाल्या होत्या. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत त्यांनी आपला उमेदवार दिला नव्हता, पण इतर पोटनिवडणुकीत तसे नव्हते. त्यामुळे कसबा, चिंचवड येथील पोटनिवडणुका बिनविरोध होणार नाहीत. ही लोकशाही आहे,असे अजित पवार पुण्यात म्हणाले.

कसब्यात भाजपने टिळक कुटुंबातील उमेदवार दिला नाही : नाना पटोले
मुख्यमंत्री शिंदे यांचा पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासंदर्भात फोन आला होता. एकत्र बसून चर्चा करू, असे सांगितले होते. कसब्याची उमेदवारी टिळक कुटुंबातील कुणालाही देण्यात आलेली नाही. आमदार मुक्ता टिळक आजारी अवस्थेत पक्षाला गरज होती तेव्हा अखेरपर्यंत काम केले, असे नाना पटोले पुण्यात बोलताना म्हणाले.

बिनविरोध निवडणूक ही संकल्पना लोकशाहीत नाही, : अॅड. प्रकाश आंबेडकर
नाशिक | शिवसेनेने दोन्ही उमेदवार द्यावे असे आमचे म्हणणे आहे. शिवसेनेची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी याबाबत भूमिका जाहीर करू. मात्र हल्ली मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वजण पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु बिनविरोध निवडणूक ही लोकशाहीमध्ये संकल्पना नसल्याचे स्पष्ट मत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्राद्वारे निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन केले आहे. कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने अनुक्रमे हेमंत रासने आणि अश्विनी जगताप यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

बिनविरोधाची परंपरा जपण्याचे आवाहन
विद्यमान आमदाराचे निधन झाल्यास तेथील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा संकेत राजकीय वर्तुळात अनेकदा पाळला गेला आहे. त्याला अनुसरून भाजपकडून विरोधकांना आवाहन केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...