आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून आज निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल तसेच निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांच्या उपस्थितीत मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क येथील मतमोजणी केंद्रात झालेल्या या प्रशिक्षणावेळी उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे, संजय तेली, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राधिका हावळ- बारटक्के आदी उपस्थित होते.
किसवे- देवकाते आणि भंडारे यांनी आज प्रशिक्षणादरम्यान मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणी करताना घ्यायची काळजी, भरायचे विविध नमुने (फॉर्म) आदीबाबत सूचना दिल्या. इव्हीएम वरील उमेदवारनिहाय मतांची मोजणी व नोंद, फॉर्म भरणे, निवडणूक आयोगाच्या एन्कॉर ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये माहिती भरणे, मतमोजणीनंतर पुन्हा इव्हीएम सीलिंग करणे, साहित्य पुरवठा याबाबत प्रशिक्षण दिले. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
मतमोजणीच्या 20 फेऱ्या
मतमोजणी 2 मार्च रोजी सकाळी आठ वाजता भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे सुरू होणार आहे. त्यासाठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सर्वप्रथम टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहायक आणि 1 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे 50 अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर उमेदवार निहाय मतांची उद्घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ध्वनीक्षेपकाद्वारे करतील. सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर यादृच्छिक (रँडम) पद्धतीने 5 व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिपची मोजणी केली जाणार आहे. कंट्रोल युनिट वरील मतांची संख्या आणि व्हीव्हीपॅट स्लिप्सची पडताळणी केली जाणार आहे.
मतमोजणी केंद्रावर माध्यम कक्ष, पोलिस समन्वय कक्ष, निवडणूक उमेदवार व प्रतिनिधी यांच्यासाठी कक्ष याबाबतची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनतळ व्यवस्था गाडगे महाराज विद्यालय कोरेगाव पार्क या ठिकाणी असलेल्या मैदानावरील मोकळ्या जागेत असणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किसवे- देवकाते यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.