आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार होते. मात्र, या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. बारावीची परीक्षा असल्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात पुण्यात होत असलेल्या निवडणूका केंद्रस्थानी आहेत. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा आयोगाने काही दिवसांपूर्वी केली होती. तेव्हापासून या दोन्ही निवडणूका बिनविरोध व्हाव्या यादृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र महाविकास आघाडीतही जोरदार खलबत सुरु आहेत.
26 फेब्रुवारीला मतदान होईल
निवडणूक आयोगाने याआधी 27 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 2 मार्च रोजी मतमोजणीची तारीखही निश्चित केली होती. मात्र बारावी आणि इतर परीक्षा असल्यामुळे मतदानासाठी केंद्र उपलब्ध होणे अवघड आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी एक दिवस आधीच मतदान घेण्याचे ठरले आहे. आता कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान होईल. या पोटनिवडणुकीचा निकाल ठरल्याप्रमाणे 2 मार्च रोजीच जाहीर होईल.
चिंचवडची जागा शिवसेनेने लढावी
संजय राऊत यांनी आज निवडणूकांबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अजित पवार, जयंत पाटील आणि सुनील तटकरे काल रात्री मातोश्रीवर आले होते. आम्ही या दोन पोटनिवडणुकीवर काय निर्णय घ्यायचा यावर चर्चा केली. उद्या त्यावर पुन्हा निर्णय घेऊ. निवडणूक लढलीच तर जी चिंचवडची जागा ती शिवसेनेने लढावी असे आमचे मत आहे. कसब्याबाबत राष्ट्रवादी निर्णय घेईल. असेही राऊत म्हणाले.
बिनविरोध व्हावी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणूक उमेदवार मागे घेतला होता. त्यामुळे आता कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूकही बिनविरोध झाली पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.