आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबहुचर्चित ठरणाऱ्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने शनिवारी सकाळी उमेदवार जाहीर केले. कसबा पेठ येथून अपेक्षेप्रमाणे हेमंत रासने यांना तिकीट देण्यात आले, मात्र हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी कसबा पोटनिवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्याने आता भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
चिंचवडमध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्यातील कसबा विधानसभेचे यापूर्वी गिरीश बापट, तर त्यानंतर मुक्ता टिळक यांनी नेतृत्व केले. हा मतदारसंघ ब्राम्हण समाजातील उमेदवारांना साथ देणारा असल्याचे यापूर्वी देखील स्पष्ट झाले आहे. मात्र आता याठिकाणी दिलेल्या उमेदवारावरुन ब्राम्हण समाज नाराज झाला आहे.
हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट
हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी कसबा पोटनिवडणुकीतील भाजपने दिलेल्या उमेदवारीवरून ब्राम्हण समाजात तीव्र नाराजी पसरल्याचे सांगितले. तसेच भाजपकडून चिंचवडमध्ये न्याय तर कसब्यात अन्याय केल्याचा आरोपही यावेळी केला. आनंद दवे सोमवारी कसब्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे कसब्यात हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अशी होणार लढत
कसबा पेठ मतदार संघातून मुक्ता टिळक या आमदार होत्या. मात्र, कर्करोगाशी झुंजताना त्यांचे निधन झाले. तर चिंचवडमधली जागा लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झाली होती. आता या दोन्ही जागेवर भाजपने उमेदवार दिले आहेत. कसबा पेठमधून हेमंत रासने यांना तिकीट देण्यात आले आहे. तर चिंचवडमधून भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.