आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षांच्या अभ्यासक्रमाची घोषणा:भारती विद्यापीठात किर्तन पदविका घेता येणार; वारकरी आणि नारदीय दोन्ही परंपरांचे शिक्षण मिळणार

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किर्तन पद्धतीचा अभ्यास करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्याला कीर्तनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावे तसेच त्याला हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् किर्तन पदविका अभ्यासक्रमाला येत्या जुलै महिन्यापासून सुरुवात होणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक प्रा. शारंगधर साठे यांनी कळवली आहे.

महाराष्ट्रामध्ये किर्तनाची मोठी परंपरा आहे. मनोरंजन आणि त्यातूनच समाज प्रबोधन करण्याचे सर्वात महत्वाचे साधन म्हणून किर्तन या प्रकाराकडे बघितले जाते. महाराष्ट्रात वारकरी आणि नारदीय अशा दोन किर्तन पद्धती महत्वाच्या मानल्या जातात. या कीर्तन पद्धतींचा अभ्यास पारंपारिक पद्धतीने अनेक विद्यार्थी करीत असतात. परंतु विद्यापीठीय पातळीवर अशी सोय फारशी उपलब्ध नाही. त्यामुळे

A+ दर्जा असलेले विद्यापीठ म्हणून नावलौकिक असलेल्या भारती विद्यापीठाने सदर अभ्यासक्रमाला सहा वर्षांपूर्वी यशस्वीरीत्या सुरुवात केली. आजवर एकूण तीन वर्गांनी हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असून त्यात 50 हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. भावी काळाचा विचार करता किर्तन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळणे हे अत्यंत महत्वाचे ठरेल.

अभ्यासक्रमाची महत्वाची वैशिष्ट्ये सांगताना प्रा. साठे म्हणाले की ऑनलाइन व ऑफलाईन दोन्ही शिक्षण पद्धतीचा अवलंब असणारा हा अभ्यासक्रम एकूण चार वर्षांचा आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या अभ्यासक्रमात विद्यार्थ्याला वारकरी आणि नारदीय कीर्तन या दोन्ही पद्धतींचा अभ्यास एकाच वेळी करता येतो. त्याबरोबरच अभंग, कीर्तन, आख्यान, माहात्म्य, संस्कृत आणि मराठी सुभाषिते, गीतेतील अध्याय, विविध वृत्तांचा अभ्यास तसेच संगीतातील विविध घटकांचा अंतर्भाव देखील या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय ख्यातीचे कीर्तनकार चारुदत्त आफळे, लोक साहित्य आणि कलांचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, प्रसिद्ध कीर्तनकार गणेश महाराज भगत, योगीराज महाराज गोसावी, सचिन महाराज पवार, संतोष महाराज पायगुडे यांच्यासारख्या विद्वान, उच्चविद्याविभूषित, सुप्रसिद्ध किर्तनकार गुरुजनांद्वारा रीतसर गुरुकुल पद्धतीने अध्यापन केले जाते.

सर्व स्तरातील अभ्यासकांसाठी हा 4 वर्षांचा पदविका अभायास्क्रम नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास प्रा. प्रा. शारंगधर साठे यांनी व्यक्त केला. सदर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही शाखेतून इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाची फी प्रती वर्ष फी रुपये 18000 इतकी आहे. अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी spa.bharatividyapeeth.edu या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...