आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खूनप्रकरणी मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी अध्यक्ष आणि किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे यांनी तक्रार दिली आहे.
तळेगाव दाभाडे येथे शुक्रवारी भर दुपारी गोळीबार आणि कोयत्याचे वार करून आवारे यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. या प्रकरणी सुनील शेळके यांच्यासह सुधाकर शेळके, श्याम निगडकर, संदीप गराडे आणि इतरांवर गुन्हा दाखल झाल्याचे समजते.
राजकारणातून खटके
किशोर आवारे यांच्या आई तळेगाव दाभाडेच्या माजी नगराध्यक्ष होत्या. विशेष म्हणजे किशोर आवारे सुद्धा राजकारणात सक्रिय होते. त्यामुळेच त्यांचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके आणि संदीप गराडे यांच्यात अनेकदा खटके उडायचे. त्यामुळे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे किशोर आवारे यांनी आपल्या आईला सांगितले होते.
आवारेंचा वेगळा गट
किशोर आवारे यांनी स्वतःचा वेगळा गट केला होता. त्यांनी आमदार सुनील शेळकेंच्या विरोधात आघाडी उघडली होती. त्यांनी केलेल्या चुकीच्या कामांबाबत आंदोलनही केले होते. शिवाय ते संतोष शेळके यांच्यासोबत फिरत. आवारे यांचे वाढते राजकीय प्रस्थ पाहता त्यांच्यावर हल्ला केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
असा केला हल्ला
किशोर आवारे शुक्रवारी दुपारी मारुती मंदिरे येथील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कार्यालयात मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी आलेले होते. मुख्याधिकारी यांना भेटून झाल्यानंतर ते नगरपरिषदेच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना त्यांच्यावर दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला, तर दोन हल्लेखोरांनी कोयत्याने वार केले. त्यात श्याम निगडकर आणि त्याचे तीन साथीदार असल्याचे समजते.
पोलिसांचा तपास सुरू
हल्ल्यात आवारे गंभीर जखमी झाले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संबंधित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. आवारे यांना सोमाटणे फाटा येथील पावना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. हल्ल्याची माहिती मिळताच, तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे पोलिस यांच्यासह मोठा पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला. याबाबत पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.
संबंधित वृत्तः
जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा खून; नगरपरिषदेबाहेर गोळीबार करून कोयत्याचे वार
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.