आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालव्याशेजारील विहिरींना पाणीपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव:कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे पाठवावा - पालकमंत्री

पुणे2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कालव्यांच्या शेजारील विहिरींना पाणीपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत शुक्रवारी (25 नोव्हेंबरला) दिले.

पुणे जिल्ह्यातील नीरा उजवा कालवा, नीरा डावा कालवा, खडकवासला, भामा आसखेड, पवना व चासकमान प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

2009 पर्यंत कालव्यांशेजारील विहीरींना पाणीपट्टी आकारण्याची तरतूद होती. मध्यंतरी ती बंद करण्यात आली होती. आता पुन्हा 2022 पासून पाणीपट्टी आकारण्याचे महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे आदेश आहेत. त्यामुळे पुर्वीची व्याजासह थकबाकीची रक्कम आणि यापुढे होणारी आकारणी अशी सर्व रक्कम शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन माफ करण्याबाबत शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न केले जातील. तसा प्रस्ताव महामंडळाने शासनाकडे पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले.पुणे महानगर पालिकेने पाणीपुरवठ्यातून होणारा 35 टक्के इतका अपव्यय रोखल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल, त्यासाठी महानगरपालिकेने 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करावी, जायका प्रकल्प गतीने पूर्ण करावा असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

जिल्ह्यातील सर्व धरणप्रकल्पांमध्ये सध्या जवळपास शंभर टक्के पाणीसाठा आहे. भाटघर, वीर, गुंजवणी व नीरा देवघर मध्ये 48 टीएमसी पाणीसाठा आहे. नीरा उजवा कालव्यातून 27 टीएमसी आणि नीरा डावा कालव्यातून 12.25 टीएमसी पाणीवापर मंजूर आहे. सिंचन, पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी मंजूर पाणीवापरानुसार मुबलक पाणी उपलब्ध असून नीरा उजवा कालवा आणि नीरा डावा कालव्यातून रब्बी हंगामात दोन आणि उन्हाळी हंगामात दोन आवर्तने देण्यात येणार आहेत. रब्बी हंगामातील पहिले आवर्तन 22 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. पहिले आवर्तन 14 जानेवारी पर्यंत पूर्ण करुन दुसरे आवर्तन 15 जानेवारीपासून सोडण्याचे नियोजन असून त्यास पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीने मान्यता दिली.

खडकवासला प्रकल्पात सध्या 27.38 टीएमसी पाणीसाठा असून साठ्याची टक्केवारी 93.92 टक्के आहे. लाभक्षेत्रातील 18 तलावांमध्ये धरणाचे पाणी सोडून व कार्यक्षेत्रात झालेल्या पावसामुळे हे सर्व तलाव 100 टक्के भरण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेने अतिरिक्त पाणीवापर टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी लोकप्रतीनिधींनी यावेळी केली. पिण्यासाठी, ग्रामीण भागातील सिंचनासाठी तसेच औद्योगिक वापरासाठी पाणीवापराबाबत समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी केल्या.

बातम्या आणखी आहेत...