आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणची सुरक्षा ठेव:पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरक्षा ठेवीच्या व्याजापोटी 80 लाख वीजग्राहकांना 115 कोटींचा परतावा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील उच्च व लघुदाब वर्गवारीतील 80 लाख 41 हजार 189 ग्राहकांना 114 कोटी 66 लाख रुपयांचा परतावा देण्यात येत आहे. यामध्ये मे महिन्याच्या वीजबिलांमध्ये 92 कोटी 63 लाख रुपयांचा परतावा समायोजित करण्यात आला आहे तर जून महिन्याच्या बिलामध्ये उर्वरित 22 कोटी 3 लाख रुपयांचा परतावा देण्यात येत आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता 2021 च्या विनिमय 13.1 नुसार वीजग्राहकांना सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. याआधीची जमा असलेली सुरक्षा ठेव व वीजवापरानुसार नव्याने निर्धारीत करण्यात आलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येते. यापूर्वी सुरक्षा ठेव सरासरी एका बिलाच्या रकमेइतकी होती. आता वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली.

तसेच विनिमय 13.11 नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या दराच्या सममूल्य दराने ग्राहकांना व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून अदा करण्यात येते. त्याप्रमाणे सन 2021-22 मध्ये पुणे प्रादेशिक विभागातील उच्च व लघुदाब वर्गवारीतील 80 लाख 41 हजार 189 वीजग्राहकांना एकूण 114 कोटी 66 लाख रुपयांच्या व्याजाचा परतावा मे व जूनमधील वीजबिलांच्या माध्यमातून समायोजित करण्यात येत आहे. यामध्ये 92 कोटी 63 लाख रुपयांचा परतावा मे महिन्यात देण्यात आला आहे तर 22 कोटी 3 लाखांचा परतावा जूनच्या वीजबिलामध्ये समायोजित केले आहे.

जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवरील व्याजापोटी पुणे जिल्ह्यातील 39 लाख 2 हजार 26 वीजग्राहकांना 71 कोटी 13 लाख, कोल्हापूर जिल्हा- 11 लाख 86 हजार 724 वीजग्राहकांना 14 कोटी 68 लाख, सांगली जिल्हा- 9 लाख 7 हजार 610 वीजग्राहकांना 8 कोटी 30 लाख, सातारा जिल्हा- 9 लाख 91 हजार 991 वीजग्राहकांना 9 कोटी 91 लाख आणि सोलापूर जिल्ह्यातील 10 लाख 52 हजार 838 वीजग्राहकांना 10 कोटी 64 लाख रुपयांचा परतावा देण्यात येत आहे. गेल्या एप्रिलमध्ये पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत संबंधित वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...