आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वाढदिवस विशेष:लतादीदी सध्या काय करतात याबद्दल त्यांची भाची, हृदयनाथ मंगेशकरांची कन्या राधाने सांगितलं बरंच काही...

राधा मंगेशकर | पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्याच्या कठीण काळात लतादीदींची गाणीच देतात जगण्याची उभारी : राधा मंगेशकर

गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज ९१ वा वाढदिवस. कोरोनाचे संकट डोकावण्यापूर्वीच लतादीदी एका मोठ्या आजारपणातून बऱ्या झाल्या. आता फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत घरातच त्यांची काळजी घेतली जात आहे. त्यांच्याविषयीच्या ‌भावना व्यक्त केल्या आहेत त्यांची भाची अर्थात हृदयनाथ मंगेशकर यांची कन्या राधा यांनी...

सध्याचा काळ विपरीत आहे. कोरोना महासंसर्गाच्या जागतिक संकटामुळे सगळीकडे आणि प्रत्येक व्यक्तीवर उदासीनता, नैराश्य, भीती, धास्ती आणि अनिश्चिततेचे सावट दाटून आले आहे. अशा परिस्थितीतही केवळ लता आत्याच्या गाण्यांमुळेच आपण जिवंत आहोत, त्यांच्या संगीतामुळेच आपण अजून नॉर्मल आहोत असे वाटते. कोरोना संकट कधी संपणार, त्याला नेमका किती काळ लागणार हे कुणीच सांगू शकत नाही. पण गेल्या सहा महिन्यांपासून सर्व कार्यक्रम, उपक्रम, प्रकल्प बंद असूनही जगण्याची उभारी आणि दिलासा देतात ती त्यांचीच गाणी, तेच चित्रपट... आज (सोमवार, २८) लतादीदींचा ९१ वा वाढदिवस आहे. नेहमीसारखा तो साजरा करता येणार नाही, पण अशा अवघड काळातही त्या आपल्यासोबत, आपल्याबरोबर आहेत ही एकच गोष्ट धीर देणारी वाटते. खरंतर, कोरोना संकटाची चाहूल लागण्यापूर्वीच लतादीदी एका मोठ्या आजारातून उठल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन वेळापत्रकावर त्याचा परिणाम झालाच होता. पण कोरोना संकट सुरू झाल्यावर या सगळ्यात खूपच भर पडली. वयामुळे काही बंधने आधीपासूनच आली आहेत. त्यात आता खूपच पथ्यपाणी, औषधे आणि फिजिकल डिस्टिन्सिंगची नियमावली लागू झाली आहे. आम्ही कुटुंबातली मंडळीही त्यांना सतत भेटू शकत नाही. भेटायचे असेल तर मास्क अनिवार्य असतो. त्यांची औषधे, नर्सिंग, विश्रांती हे सांभाळून सगळ्यांना वागायचे असते. पण दीदींची तब्येत चांगली आहे, त्या आपल्यासोबत आहेत याचा आनंदच इतका मोठा आहे की ते वरदानच आहे असं वाटतं. साक्षात सरस्वती माँसोबत असल्यासारखे वाटते. ही सोबत अशीच राहावी, अशी प्रार्थना असते.

मुंबईमधली आमची प्रभुकुंज ही इमारत मध्यंतरी मनपाने सील केली होती. कारण, इमारतीत अनेक कोरोना पाॅझिटिव्ह सापडले होते. आमच्या घरात तर ८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे अनेक जण. त्यामुळे सर्वाधिक काळजी आम्ही घेत आहोत. घरातील सदस्य आणि अन्य मदतनीस कुणालाच बाहेर जाण्याची परवानगी नाही. सगळे घरात बंद आहेत सहा महिन्यांपासून. मी तर सध्या ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर.. यात आलटून-पालटून रमले आहे. त्यांच्याकडूनच शिकलेले पदार्थ त्यांच्यासाठी बनवताना वेगळेच समाधान मिळते. या सर्व कठीण काळात जुने चित्रपट पाहणे आणि आमच्या खासगी ध्वनिमुद्रिकांच्या संग्रहालयातील गाण्यांचा खजिना पुन्हा पुन्हा ऐकणे हाच विरंगुळा आणि दिलासा आहे. त्यांची गाणी जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा दरवेळी काहीतरी नवे सापडत जाते.

सगळे बंद असूनही मी आज नॉर्मल आहे याचे श्रेय त्यांच्या संगीताला आहे. लतादीदींप्रमाणेच मला नूरजहां, मोहंमद रफी साहेब यांची गाणीही विलक्षण प्रिय आहेत. आमच्याकडे त्यांच्या चित्रपट गीतांप्रमाणेच असंख्य खासगी ध्वनिमुद्रिकांचा मोठा संग्रह आहे. अभिनेते दिलीपकुमार यांचे चित्रपट, त्यांचा अभिनय, संवादाची पद्धती, आवाज आणि एकूणच त्यांचे व्यक्तिमत्त्व मला आदर्शवत आहे. गुरुदत्त, बिमल रॉय तसेच देव आनंद यांचेही चित्रपट मी पुन्हा पुन्हा पाहते. सुवर्णकाळातले या सर्वांचे काम नवा, ताजा आनंद देणारे असते. नवे शिकवणारे ठरते. आम्हा कलाकारांसाठी स्टेज हेच सर्वस्व आहे. आता हाच ध्यास, हीच आस आहे की रसिकांसमोर पुन्हा कधी जाता येईल?...सध्या हा प्रश्न अनुत्तरित असला तरी कोरोना संकट लवकर संपावे, सगळी नकारात्मकता, उदासीनता, अनिश्चितता संपुष्टात यावी हीच इच्छा आहे.

लतादीदी ठीक आहेत...

कोरोना संकटकाळात फिजिकल डिस्टन्सिंगचे भान आवश्यक असल्याने लतादीदी कुणालाही भेटू शकत नाहीत. आम्हा कुटुंबीयांनाही त्यांना भेटताना नियमावली पाळावी लागते. प्रोटोकॉल असतो. पण दीदींची तब्येत चांगली आहे हे त्यांच्या चाहत्यांसाठी सांगते. त्या व्यवस्थित आहेत. दैनंदिन गोष्टी करतात. त्यांच्यासाठी मदतनीस आहेत आणि सर्व कुटुंबीयही सदैव सोबत असतात. घरात बंद असल्या तरी कुठे काय घडतंय याची माहिती त्या घेतात. नियमित ट्वीट करून आपल्या भावना त्या व्यक्त करतात.