आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात संशयित आणि ओंकार बाणखेले खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष जाधवला कुख्यात लॉरेन्स बिष्णोई याचा साथीदार विक्रम ब्रार याने मध्य प्रदेशात दोन पिस्तुले व दारूगोळा आणण्यासाठी पाठवले होते. त्यापैकी एका पिस्तुलाचा वापर बाणखेलेच्या खुनासाठी केल्याची कबुली संतोष जाधवने दिली आहे. याशिवाय संतोष जाधवच्या टोळीतील सदस्यांकडून १३ पिस्तुले जप्त करण्यात आली असून, मध्य प्रदेशातील ‘जॅक स्पॅरो’ नामक व्यक्तीकडून ती मिळवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विशेष न्यायालयाला दिली.
संतोष जाधव (२७, रा. पोखरी, आंबेगाव, सध्या रा. मंचर) आणि त्याला फरार असताना आश्रय देणारे सिद्धेश कांबळे ऊर्फ सौरभ महाकाल ( १९, रा. नारायणगाव, जुन्नर), नवनाथ सूर्यवंशी (२८, विखले, खटाव, सातारा, सध्या रा. भुज, गुजरात) आणि तेजस कैलास शिंदे (२२, रा. नारायणगाव, जुन्नर) यांना विशेष न्यायालयाने २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गेल्या वर्षी एक ऑगस्टला आंबेगावमधील एकलहरे गावात ओंकार बाणखेलेचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात संतोष जाधवसह चौदा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मकोका) मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘काम झाले आहे, साडेतीन लाख रुपये मिळाले’ : सिद्धू मुसेवाला याची २९ मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावात भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर नवनाथ सूर्यवंशी याने १ जून रोजी सिद्धेश कांबळेला कॉल करून, ‘काम झाले आहे, साडेतीन लाख रुपये मिळाले आहेत,’ असे सांगून बँक खाते क्रमांक मागितला होता. याशिवाय संतोष व त्याच्या मित्रांनी हरयाणातील अंबाला कॅन्टोनमेंट येथे पिस्तुलाचा धाक दाखवून लूटमार केली होती, असे सिद्धेश कांबळे याने पोलिस तपासात सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.