आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अग्निपथ'विरोधातला हिंसाचार राजकीय हेतूने:भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लष्करात जाऊन देशाची सेवा करू इच्छिणारे तरुण कधीही देशाच्या संपत्तीचे नुकसान करू शकत नाहीत. अग्निपथ योजनेच्या विरोधात चाललेला हिंसाचार हा राजकीय हेतूने आहे, असा आरोप शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. या हिंसाचाराबद्दल गुन्हे दाखल झाल्यामुळे संबंधित तरुणांना कोणतीही नोकरी मिळणे अशक्य होईल व त्यांचे करिअरचे कायमस्वरुपी नुकसान होईल, याची जाणीवही त्यांनी करून दिली.

तरुणांचे नुकसान नाही

चंद्रकांत पाटील म्हणाले की, अग्निपथ योजनेतून केंद्र सरकारने तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करण्याची संधी दिली आहे. या योजनेमुळे तरुणांना लष्करी प्रशिक्षण मिळेल, चांगले वेतन आणि नोकरी सोडताना साडेअकरा लाख रुपये मिळतील. तसेच सैन्यातून परतल्यानंतर समाजात व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. या योजनेमुळे समाजात लष्करी प्रशिक्षण मिळालेल्या शिस्तबद्ध तरुणांचे प्रमाण वाढेल. या योजनेमुळे तरुणांचे कोणतेही नुकसान होणार नाही. अग्निपथ योजनेसोबत नियमित लष्करी भरतीसुद्धा चालूच राहणार आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राजकीय हेतुने अग्निपथच्या विरोधात हिंसाचाराला चिथावणी देण्यात येत आहे. या हिंसाचारात भाग घेणाऱ्या तरुणांच्या विरोधात गुन्हे दाखल होतील. नंतर त्यांना लष्करात, सरकारमध्ये किंवा खासगी क्षेत्रातही नोकरी मिळणार नाही. त्यांचे आयुष्यभराचे नुकसान होईल. हिंसाचार केल्यामुळे आपले करिअरचे काय नुकसान होईल याचा तरुणांनी विचार करावा.

शांतपणे विचार करावा

पाटील म्हणाले की, तरुणांनी या योजनेबाबत पूर्ण माहिती घेऊन शांतपणे विचार करावा. अग्निपथ योजनेबाबत पूर्ण माहिती घेतली तर गैरसमज दूर होईल. ज्या तरुणांना लष्करात भरती होऊन देशाची सेवा करायची आहे, ते कधीही राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करून समाजात संकट निर्माण करणार नाहीत. सध्या या योजनेच्या विरोधात काही ठिकाणी होत असलेला हिंसाचार हा राजकीय हेतूने घडविण्यात येत आहे. समाजात अराजकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.

बातम्या आणखी आहेत...