आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:वारकरी सांप्रदायातील अग्रणी कीर्तनकार बंडातात्या कराडकर नजरकैदेत; आमदार लांडगेंच्या मध्यस्थीने आंदोलन टळले!

पिंपरीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिघीतून कीर्तनकार बंडातात्या पोलिसांसोबत पंढरपूरकडे रवाना
  • भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची मध्यस्थी

वारकरी सांप्रदायातील अग्रणी कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नरजकैद केले आहे. तसेच, पोलिसांसोबत बंडातात्या आता गाडीमधून पंढरपुरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

कोरोना नियम डावलून पायी वारीला सुरूवात केल्यामुळे बंडातात्या यांना ताब्यात घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. बंडातात्या यांना दिघीतील संकल्प मंगल कार्यालयात अप्रत्यक्ष स्थानबद्धही करण्यात आले होते. मात्र, काल रात्रीपासूनच भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी बंडातात्यांची भेट घेतली. आज सकाळी बंडातात्या यांच्या समर्थक वारकऱ्यांनी पोलिसांची गाडी अडवली. तसेच, आम्ही पायी चालत पंढरपुरला जाणार, अशी भूमिका घेतली.

दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी बंडातात्या आणि वारकऱ्यांमध्ये मध्यस्थीची भूमिका केली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपण प्रशासनाला सहकार्य करण्याची भावना ठेवली पाहिजे. पालखी सोहळ्याला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडली. दोन तास झालेल्या चर्चेनंतर अखेर बंडातात्या यांनी गाडीतून पंढरपूरला जाण्यास होकार दर्शवला. मात्र, माझ्यासोबत असलेल्या वारकऱ्यांना पायी पंढरपूरला जाण्याची परवानी द्यावी, अशी मागणी केली.

पालखी सोहळ्यात वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच, असा एल्गार बंडातात्या कराडकर यांनी केला होता. याआधी संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी बंडातात्या कराडकर यांनी देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलनदेखील केले होते.

शनिवारी सकाळी पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नजरकैद केले. त्यांनी दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात मुक्काम केला होता. त्यानंतर यांच्या समर्थक वारकऱ्यांनी संकल्प गार्डन बाहेर जमायला सुरुवात केली होती. आंदोलनाची परिस्थिती असतानाच आमदार महेश लांडगे याठिकाणी दाखल झाले. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक विकास डोळस यांच्यासह पदाधिकारी- कायकर्ते उपस्थित होते.

पायी चालणे हा गुन्हा असेल, तर रोज तसे लाखो गुन्हे दाखल करा. सर्व सामान्य नागरिकाचा पायी चालणे हा हक्क कोणतेही सरकार काढू शकत नाही अशी भूमिका बंडातात्या कराडकर यांनी घेतली होती. त्यामुळे आंदोलन होईल, अशी शक्यता असतानाच आमदार लांडगे यांनी प्रसंगावधान राखत वारकऱ्यांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

७०० वर्षांची परंपरा पण, प्रशासनाला सहकार्य गरजेचे : आमदार लांडगे
आमदार लांडगे म्हणाले की, महाराष्ट्रात तब्बल ७०० वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. प्रत्येकवर्षी आषाढी वारीसाठी पायी पालखी सोहळा निघतो. मात्र, गेल्या वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे पायी पालखी सोहळा करता येत नाही. मी स्वत: एक वारकरी कुटुंबात जन्म घेतला आहे. ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या भावनेशी मी सहमत आहे. पण, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे. ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या आता पोलीस बंदोबस्तात पंढरपूरकडे रवाना झाले आहेत, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...