आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिबट्याच्या शिकारी जाळ्यात सापडलेल्या सावजाच्या अनेक गोष्टी सांगता येतील, पण खुद्द बिबट्याच मानवनिर्मित वायर्सच्या जाळ्यात अडकल्याची दुर्मिळ घटना बुधवारी पुणे जिल्ह्यात घडली. या मादी बिबट्याची वनविभाग आणि वाईल्डलाईफ एसओएस संस्थेच्या रेस्क्यू पथकाने सुखरूप सुटका केली.
बुधवारी पहाटे पुणे जिल्ह्यातील ओतूर वनविभागाच्या अंतर्गत घुलुनचंद वाडी परिसरात एक मादी बिबट्या भक्ष्याच्या पाठलागावर धावताना केबल वायर्सच्या जाळ्यात अडकला. सुटण्याच्या प्रयत्नात धडपड करताना बिबट्या वायर्सच्या जाळ्यात अधिकाधिक गुरफटत गेला. वायर्सचे जाळे बिबट्याच्या संपूर्ण अंगाभोवती घट्ट झाले. तशाच अवस्थेत बिबट्याने जवळच्या वटवृक्षावर झेप घेतली. पण वृक्षाच्या पारंब्याही त्याच्याभोवती गुंडाळल्या गेल्या. बिबट्याचा श्वास कोंडला जाऊ लागला. त्याची प्राणांतिक गुरगुर ऐकताच ग्रामस्थांनी त्वरित वनविभागाला कळवले.
वनविभाग आणि वाईल्डलाईफ एसओएस संस्थेचे कार्यकर्ते लगेच रेस्क्यू पथक आणि योग्य त्या साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याची परिस्थिती पाहून बिबट्याला डार्ट (बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन) मारण्याचा निर्णय घेण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. चंदन सवाने यांनी रेस्क्यू पथकाच्या सहाय्याने डार्ट मारला आणि बिबट्याला आधी वायर्सच्या जाळ्यातून मुक्त केले. त्यानंतर बिबट्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी व सुरक्षेचे उपाय, यासाठी खास पिंजऱ्यात घालून माणिकडोह बिबटे रेस्क्यू सेंटरला हलवण्यात आले.
डाॅ. सवाने म्हणाले, 'बिबट्याची ही मादी प्रौढ वयाची असून तिचे वय सुमारे 9 वर्षांचे आहे. वायर्सचे जाळे आवळले गेल्याने तिचा श्वास कोंडला होता. पण आता तिची तब्येत ठीक आहे. वैद्यकीय तपासणी पूर्ण होताच तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येईल, '.
ओतूर वनविभागाचे अधिकारी वैभव काकडे म्हणाले, 'पहाटे चारच्या सुमारास ही बिबट्याची मादी शिकारीसाठी भक्ष्याच्या पाठलागावर धावताना केबल वायर्सच्या जाळ्यात अडकली असावी.'
वाईल्डलाईफ एसओएस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. कार्तिक सत्यनारायण म्हणाले, 'ग्रामस्थ आणि वनविभागाने त्वरित प्रतिसाद दिला त्यामुळे मादी बिबट्याचे प्राण वाचू शकले, '.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.