आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्यांना अयोध्येला जायचे आहे, त्यांनी जरूर जावे, मात्र, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी तरी कोरोना परिस्थितीत लक्ष घालावे, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी लगावला आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, आजची नेमकी परिस्थिती सांगा, असे आम्ही म्हटले होते.
अधिवेशनातदेखील याची मागणी केली होती. मात्र, कोरोना संख्या वाढत असली तरी अजून त्याचे गांभीर्य दिसत नाही. सरकारने याबाबत सांगितले पाहिजे. आदेश काढले पाहिजेत. मुळात मंत्रीच मास्क वापरात नाहीत. त्यामुळे जनता मास्कचा वापर गांभीर्याने कसा घेणार, हा प्रश्न आहे. जनतेला वस्तुस्थिती सांगायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत आपणास काही म्हणायचे नाही. ज्यांना अयोध्येला जायचे आहे, त्यांनी जरूर जावे. आमचा त्याला विरोध नाही. मात्र, जे उपलब्ध आहेत, त्या उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी तरी कोरोना परिस्थितीत लक्ष घालावे.
ठाकरे व शिंदे यांनी एकत्र यावे, असे चंद्रकांतदादांना म्हणायचे असेल, तर त्यांनी ते जरूर म्हणावे. मात्र, जाती व धर्माबद्दल हेत्वारोप करण्याचे कारण नाही. जाती, धर्म व पंथाला वेदना होतील, अशी वक्तव्ये कुणी करू नयेत. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. राजकारण्यांनी लोकभावना जपल्या पाहिजेत. लोकांच्या भावना दुखावल्या जातील, असे काही बोलू नये, असे सुनावतानाच वर्षातील चहा बिलासंदर्भात आपण बोललो. कारण जनतेचा पैसा हा नीट खर्च झाला पाहिजे, अशीच आपली मागणी होती, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
राऊत यांनी कोणाला पत्र लिहावे, हा त्यांचा अधिकार आहे. जबाबदार खासदार आरोप करतात, तेव्हा विचार करायला पाहिजे, चौकशी व्हायला हवी, असे सांगतानाच मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही. पण अशी वक्तव्य कोणी करू नयेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी फडतूस व काडतूस याविषयीच्या टिप्पणीवर बोलताना केली.
आमचा हनुमान चालीसाला विरोध नाही. जिथे पठण करायचे तिथे नक्की करा.. त्यांना जर त्यातून समाधान मिळत असेल, तर त्यांना ते मिळू द्यायला आम्ही तयार आहोत, असे नमूद करत मलाही काश्मीर ते कन्याकुमारी सगळीकडे जाऊन दर्शन करावे, असे वाटते. पण लोकांची इतकी गर्दी असते, की मला काही शक्य होत नाही, असेही पवार यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.