आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानैराश्य, भावनिक तणाव आणि एकटेपणाने ग्रासलेल्यांना आधार देण्यासाठी कार्यरत असलेल्या साथी हाथ बढाना या संस्थेतर्फे 'लिसनिंग पोस्ट' उपक्रमाची हेल्पलाईन पुन्हा एकदा सुरु झाली आहे.
विनामूल्य हेल्पलाईन क्रमांक ९३७३३३९१६२ असा असून, रोज दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत विनामूल्य कॉल करता येणार आहे. तसेच प्रत्यक्ष भेटीसाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी सकाळी ११ ते १, तर शुक्रवार आणि शनिवारी सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत औंध येथील गायकवाड नगर येथे स्थलांतरित झालेल्या साथी हाथ बढाना संस्थेच्या कार्यालयात संवाद करता येईल.
साथी हाथ बढाना ही स्वयंसेवकांनी एकत्रित येऊन सुरु केलेली संस्था असून, मानसिक व भावनिक तणावाचा सामना करणाऱ्या समाजबांधवांना प्रेरणा देण्यासाठी काम करते. निराशा आणि एकाकीपणाच्या भावनांना प्रतिसाद म्हणून सुरू करण्यात आलेल्या लिसनिंग पोस्टने आतापर्यंत परीक्षेच्या त्रासापासून आणि पालकांच्या दबावापासून ते एकाकीपणा, घरगुती हिंसाचार आणि कामाच्या ठिकाणी तणाव अशा अनेक प्रकारच्या भावनिक त्रासांना समजून घेत त्यांना आधार व पाठिंबा दिला आहे.
सर्व वयोगटातील व्यक्तींना निर्णयाची भीती न बाळगता त्यांच्या भावना आणि संघर्ष मोकळेपणाने मांडण्यासाठी ही एक सुरक्षित आणि आश्वासक जागा आहे. येथे होणारी संभाषणे गोपनीय ठेवली जाणार आहे. स्वयंसेवक आधारित असलेल्या या संस्थेत वेगवेगळ्या क्षेत्रातील असून, हेल्पलाईन आणि प्रत्यक्ष संभाषणातून मानसिक आधार देण्याआधी त्यांनी कठोर प्रशिक्षण घेतलेले असते.
'लिसनिंग पोस्ट'नऊ वर्षे पूर्ण करत असून, अनेक हेल्पलाईनवर तसेच प्रत्यक्ष भेटून लाभ घेतलेल्या व या चक्रातून बाहेर पडलेल्या व्यक्तींनी साथी हाथ बढाना संस्थेत येऊन, ईमेलद्वारे त्यांच्या भावना व्यक्त करत त्यांच्या कठीण काळात दिलेल्या पाठिंब्याबद्दल, आधाराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. या सामाजिक कार्यात स्वयंसेवकांनी सातत्याने सेवा दिली आहे. लिसनिंग पोस्ट ही सेवा पूर्णतः मोफत असून, समाजातील दानशूर व स्वयंसेवकांच्या अर्थसाहाय्यावर आधारित चालते.
हे एक असे शांततापूर्ण ठिकाण आहे, जिथे प्रत्येकाला आपल्या कठीण काळात आधार, दिलासा आणि आनंद जाणवतो. कोणताही निष्कर्ष न काढता सहानुभूतीपूर्वक समोरच्याचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे मानसिक आरोग्याभोवती लागलेला कलंक मोडून काढणे आणि लोकांना गरज पडेल तेव्हा त्यांना मदत घेण्यास प्रोत्साहित करणे आज खूप महत्त्वाचे आहे. आपल्या शंका निरसनासाठी ८४४६१५२९६१ या नंबरवर संपर्क साधावा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.