आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाच्या क्षेत्रातला साक्षरतेचा आलेख वाढला:अनेक लोकांच्या योगदानामुळे हे शक्य- ज्येष्ठ साहित्यिक हरी नरके

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या शिक्षण चळवळीला सुरुवात झाली तेव्हा भारतातील साक्षरता 2 पूर्णांक 5 टक्के होती. आता साक्षरता 75 टक्केच्या पुढे गेली आहे आणि महाराष्ट्राची साक्षरता 90 टक्क्यांच्या पुढे आहे. शिक्षणाच्या क्षेत्रातला आलेख वाढला असून यामध्ये खूप लोकांचे योगदान आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत आपण खूप प्रगती केली. याचे श्रेय महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद यांसह अनेकांना आहे. त्यांच्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो. असे असले तरी अजूनही बरेच काम बाकी आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. हरी नरके यांनी सोमवारी व्यक्त केले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटसच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन न-हे येथील संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.संजीव सोनवणे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, अ‍ॅड. शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. यंदा डॉ. हरी नरके, पी. ए. इनामदार, डॉ. रवी कुमार चिटणीस, डॉ.गजानन खराटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

विजय शिवतारे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत:ला जाणून घेणे. सर्वसामान्य नाही, माझा जन्म काहीतरी वेगळे करण्यासाठी झाला आहे ही भावना ज्या दिवशी जागृत होईल त्यादिवशी तुमचे मार्ग आपोआप खुले होतील. जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर जगातील कोणतेही यशाचे शिखर तुम्ही गाठू शकता. जगातील सर्व मोठी माणसे प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेतलेली आहेत. शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु तुम्हाला घडवते ती तुमची मानसिकता आणि तुमचा आत्मविश्वास, असे त्यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले.

डॉ. संजीव सोनवणे म्हणाले, आपल्याकडे कितीही मोठे तत्त्वज्ञान, शिक्षण किंवा तंत्रज्ञान असू द्यात पण जर त्याला सद्विचारांची जोड नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही. यावेळी राजेश पांडे म्हणाले, आपला देश बदलतोय. तरुणांना प्रचंड संधी पुढच्या काळात मिळणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप बदल घडवून आणले आहेत. पुढील 3 ते 4 वर्षात शिक्षण व्यवस्था बदलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रामाणिक काम करणा-या शिक्षकांमुळे देश मोठा होतो. कोणत्याही राजकारणी व्यक्तिमुळे, पायाभूत घटकांमुळे देश मोठा होत नाही. जो शिक्षक म्हणून उभा असतो तो आपल्याजवळील सर्व ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. देशाला मोठे करायचे असेल तर फक्त शिक्षणाकडे लक्ष द्या असे मत यावेळी डॉ खिराटे यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...