आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मिसाइल वुमन’ डॉ. टेसी थॉमस यांना पुरस्कार:यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार; 1 ऑगस्टला होणार सन्मान

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मिसाइल वुमन’ ही ओळख असलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वैमानिक प्रणालीच्या महासंचालिका आणि ‘अग्नी-4 व 5’ क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या यशाच्या शिल्पकार डॉ. टेसी थॉमस यांना यावर्षी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले जाीणार आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात सोमवारी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणार्‍या सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होईल.

टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक तसेच उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी शुक्रवारी या पुरस्काराची घोषणा केली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

भारतीय संरक्षण क्षेत्राला बळ देणारे संशोधन डॉ. टेसी थॉमस यांनी केले आहे. लांब पल्ल्याच्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या क्षेपणास्त्राचे संशोधन करुन त्यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 3 हजार 500 किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. यानंतर 4 हजार, 5 हजार ते 8 हजार आणि 8 हजार ते 10 हजार किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी झाली. देशाच्या संरक्षणामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापरात टेसी थॉमस यांनी मोलाचे योगदान दिले आहे. लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील ‘स्वदेशी’चे तत्त्व अधोरेखित करणार्‍या त्यांच्या कार्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी यंदाच्या पुरस्कारासाठी डॉ. थॉमस यांची एकमताने निवड केली आहे, असे डॉ. दीपक टिळक यांनी सांगितले आहे.

स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये, असे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरुप असून टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. चंद्रकांत पाटील यांच्यासह टिळक स्मारक ट्रस्टचे विश्‍वस्त, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित असतील.

टेसी थॉमस भारतीय संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या अग्नी-4 व 5 क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या संचालिका असून या पदावरील त्या पहिल्या महिला आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 3500 किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. त्यांना भारताची ’मिसाइल वुमन’ म्हणून ओळखले जाते. ‘अग्नी -4’ क्षेपणास्त्राने नऊशे किलोमीटरची उंची गाठली आणि नंतर ते बंगालच्या उपसागरातील 3,000 किलोमीटर अंतरावरील नियोजित लक्ष्यावर अचूक आदळले. या यशात डॉ. थॉमस यांची भूमिका महत्त्वाची राहिली.

बातम्या आणखी आहेत...