आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोणंद-नीरा मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावर झालेल्या एसटी आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील तीन तरूण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 3 चुलत भावंडांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
ओंकार संजय थोपटे, पोपट अर्जुन थोपटे आणि अनिल नामदेव थोपटे (सर्व रा. पिंपरे बुद्रुक-थोपटेवाडी, ता. पुरंदर), अशी मृतांची नावे आहेत. या अपघातामुळे लोणंद-नीरा मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
लोणंद-नीरा मार्गावर लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे उड्डाण पुलावर गुरूवारी रात्री एसटी आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी (एमएच. 20 बी. एल. 4158 ) आणि नीरेकडून लोणंदकडे निघालेली मोटरसायकल (एमएच.12 आर. व्ही. 3158) यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकलवरील तिन्ही तरूण जागीच ठार झाले.
वाहतूक कोंडी
भीषण अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, उपनिरीक्षक गणेश माने आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
पुरंदर तालुक्यावर शोककळा
अपघातातील तिन्ही तरूणांच्या मृतदेहाचे लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. तिन्ही तरूण पिंपरे बुद्रुक-थोपटेवाडी, ता. पुरंदर येथील येथील आहेत. या घटनेमुळे पुरंदर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही लोणंद पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.