आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान, रात्र वैऱ्याची:पुण्यात चोरीच्या घटना वाढल्या; कात्रज, सोलापूर रस्ता परिसरात भुरट्यांचा धुमाकूळ

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून कात्रज, सोलापूर रस्ता परिसरात वेगवेगळ्या घटनेत तिघांना लुटण्यात आल्याची घटना घडली.

कात्रज भागातील सावंत विहार सोसायटी परिसरातून जात असलेल्या पादचारी महिलेच्या हातातील 70 हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक अतुल थोरात तपास करत आहेत. हडपसर भागात एका प्रवाशाला मोटारचालकाने मंगळवारी लुटल्याची घटना घडली. याबाबत नवनाथ झाडे (वय 34, रा. ओंकार काॅलनी, थेरगाव, पिंपरी-चिंचवड) यांनी या संदर्भात हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

झाडे बाहेरगावी निघाले होते. सोलापूर रस्त्यावर हडपसर भागात ते बसची वाट पाहत थांबले हाेते. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास एक मोटारचालक तेथे आले. कोठे निघाला, अशी विचारणा मोटारचालकाने केली. त्यानंतर चोरट्याने त्यांना मोटारीतून मूळगावी सोडण्याची बतावणी केली. चोरट्याने त्यांना मोटारीत धमकावले. त्यांना चाकुचा धाक दाखविला. झाडे यांच्याकडील रोकड, दोन मोबइल संच तसेच महत्वाची कागदपत्रे असा 56 हजार रुपयांचा ऐवज मोटारचालकाने लुटला. झाडे यांना पुणे-सोलापूर रस्त्यावर यवत परिसरात सोडून चोरटा पसार झाला. सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.

हडपसरमधील मांजरी भागात एका पादचारी तरुणाचा मोबाइल चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत सुहास जाधव (वय 25, रा. शेवाळवाडी, हडपसर,पुणे) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव रात्री मांजरीतील ग्रीन सोसायटी परिसरातून जात होते. त्या वेळी चोरट्यांनी जाधव यांच्या हातातील आठ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला. सहायक पोलिस निरीक्षक एम. जी. थोरात तपास करत आहेत.

5 लाखांचा ऐवज चोरीला

रेल्वे प्रवासानंतर पुणे स्टेशन परिसरात विश्रांती घेउन घरी गेल्यानंतर पिशवीतून 5 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे महिलेला लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात धाव घेउन तक्रार दिली आहे. ही घटना 2 जूनला मीडिया पार्क सोसायटी ते बी.टी.कवडे रस्ता परिसरात घडली.फिर्यादी महिला मूळची जळगावमधील चाळीसगावची आहे. 2 जुनला त्या रेल्वेने प्रवास करून पुणे स्टेशन परिसरात आल्या होत्या. त्यानंतर मीडिया पार्क सोसायटी ते बी.टी.कवडे रस्ता प्रवास करीत त्या मुलाच्या घरी गेल्या. त्यावेळी त्यांना पिशवीतील रोकड आणि दागिने असा पाच लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक पी. एस. माने तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...