आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शैक्षणिक:राज्य सरकार, खासगी विद्यापीठांमध्ये सुसंवाद नसल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान, खासगी विद्यापीठांची शासनाबरोबर चालण्याची भूमिका असावी : उदय सामंत

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विद्यार्थिकेंद्रित धोरण ठेवूनच सरकार आणि शिक्षण संस्थांनी कार्य करावे लागणार - सामंत

सरकार आणि खासगी विद्यापीठ यांच्यात सुसंवाद नसल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. विद्यार्थिकेंद्रित धोरण ठेवूनच सरकार आणि शिक्षण संस्थांनी कार्य करावे लागणार आहे. नवीन शिक्षण धोरण राबवताना खासगी विद्यापीठाच्या प्रतिनिधींच्या नियुक्त्या समितीत करण्याचा आमचा मानस आहे. शासन नेहमीच खासगी विद्यापीठांशी संवाद ठेवून काम करेल, असे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

“पेरा’ (प्रिमिन्यंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन) या खासगी विद्यापीठांच्या संघटनेकडून बुधवारी व्हर्च्युअल एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी पेरा संघटनेचे अध्यक्ष आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, उपाध्यक्ष भरत अग्रवाल, डॉ. स्वाती मुजूमदार, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. संदीप झा, एन. टी राव, डॉ. आश्विनकुमार शर्मा, डॉ. व्ही. ए. रायकर, डॉ. एकनाथ खेडकर आदी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, राज्यात खासगी विद्यापीठांची २०१४ मध्ये स्थापना झाली. यानंतर या विद्यापीठांनी स्वत:ची ताकद वापरून देशातील शैक्षणिक क्षेत्रात एक भरीव कामगिरी केली आहे. कोरोना संकट सगळीकडे असून त्यावर मात करत महाराष्ट्रातील विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ झाले पाहिजेत. त्यांना चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन मिळाले पाहिजे. पेरा संघटनेकडून आयोजित एज्युकेशन फेअर महाराष्ट्राच्या जडणघडणीला वेगळी दिशा देणारे ठरेल. कोरोनाच्या संकटकाळात खासगी विद्यापीठांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना विविध बाबींचा माहिती द्यावी. जगातील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करावा.

सरकार आणि संघटनांनी हातात हात घालून काम करावे लागणार आहे. खासगी विद्यापीठांच्या अनेक अडचणी आहेत. भविष्यात आत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देत असताना संस्थाचालकांना चांगल्या वातावरणामध्ये संस्था चालवली पाहिजे, असेही ते म्हणाले.

राज्यात लवकरच व्हर्टिकल युनिव्हर्सिटीची संकल्पना

राज्यात शासकीय वा खासगी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागा हवी ही महत्त्वाची अट असते. राज्य सरकारने त्याचा नव्याने विचार करण्याचे ठरवले आहे. राज्यात व्हर्टिकल युनिव्हर्सिटी ही संकल्पना राबवण्याचा विचार असून त्यात जागेची अट असणार नाही त्यामुळे नव्या विद्यापीठांच्या स्थापनेचा मार्ग सुलभ होणार असल्याचे ते म्हणाले. प्रा.कराड म्हणाले, महाराष्ट्राचे देशात उच्च शिक्षणात वेगळे स्थान आहे. राज्याने देशाला उच्च शिक्षणातील मॉडेल दिले आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार काही परदेशी विद्यापीठांना भारतात येण्याची परवानगी दिली आहे.