आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १४ जून रोजी जगतगुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा देहूत पार पडणार आहे. या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून, मोदी यांना मंदिर ट्रस्ट तर्फे विशेष डिझाइनची पगडी घालण्यात येणार आहे. याकरिता पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांना देहू संस्थांन विश्वस्तांनी दोन डिझायनर तुकाराम पगड्या आणि उपरणे तयार करण्याची ऑर्डर दिलीय.
तुकाराम महाराजांचा वारसा
देहू संस्थांचे नितिन महाराज काळोखे आणि आचार्य भोसले यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांच्याशी संपर्क साधला. मोदी हे १४ जून रोजी देहू संस्थानाला भेट देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागतासाठी खास तुकाराम पगडी आणि उपरणे बनविण्याचे त्यांनी सांगितले. तुकाराम महाराजांचा वारसा आणि देशाची सर्वाेच्च व्यक्ती देहूमध्ये येत आहे. त्या दृष्टीने त्यांना साजेसे काय करता येईल, अशीही त्यांनी विचारणा केली. त्या नुसार मुरूडकर झेंडेवाले यांनी एक नियमित तुकाराम पगडी आणि एक डिझायनर तुकाराम पगडी आणि उपरणे बनवत आहेत.
पगडीचे वैशिष्ट्य काय?
पगडीबाबत माहिती देताना मुरूडकर झेंडेवाले म्हणाले, डिझायनर तुकाराम पगडी ही भपकेबाज नसून पारंपरिक राहणार आहे. या मागचा आमचा उद्देशही तसाच असेल. आज तुकाराम महाराजांच्या विचारांची गरज आहे आणि त्या दृष्टीने आम्ही ज्या पद्धतीने तुकाराम महाराज जशी पगडी घालायचे तशी पगडी आम्ही बनवली आहे. या साठी त्या काळी जे कापड ही पगडी बनविण्यासाठी वापरले जात होते, त्याच पद्धतीचे कापड आम्ही वापरले असून, ही पगडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती घातल्यावर गंध आणि टिळा हा वेगळा लावण्याची गरज पडत नाही.
तुळशीच्या माळांची सजावट
मुरूडकर झेंडेवाले म्हणाले, तुकाराम महाराज हे संत होते. त्या दृष्टीने या पगडीला आम्ही तुळशीच्या माळांनी सजावट केलीय. यासाठी विशिष्ट पद्धतीने याची बांधणी केली आहे. ऑफ व्हाइट रंगाची ही पगडी राहील. याच कापडाचे उपरणेही बनविण्यात आले आहे. याच कापडावर तुकोबांचे निवडक अभंग लिहिलेत. उपरण्यावर हिंदी आणि मराठी अंभग असतील. तसेच पगडीवर एक अभंग आहे आणि हे अभंग हस्तलिखित असेल.
पुणेरी फेट्यावरून वाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी मेट्रोसह अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांना पुणे महापालिकेकडून हिरेजडीत फेटा बांधला. या फेट्यावर राजमुद्रेचा वापर केला म्हणत, काँग्रेसने मोदींना हा फेटा बांधण्यास विरोध केला होता. त्यानंतर खबरदारी घेत या फेट्यावरील राजमुद्रा काढण्यात आली. हा फेटासुद्धा मुरुडकर फेटेवाले यांनी केला होता. राजमुद्रा ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. तिचा अशा पद्धतीने वापर करत मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असल्याचे दाखवण्याचा हा प्रकार आहे, असे काँग्रेसने म्हटले होते. त्यामुळे वाद टाळण्यासाठी फेट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा काढून टाकण्यात होती.
आता काय होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पुन्हा पुण्यात येत आहेत. त्यांच्यासाठी तुकाराम महाराजांची पगडी बनवण्यात येत आहे. यावरूनही नवा वाद उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान केला जात आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून द्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत भाजपवर टीका केली होती. आता पुन्हा या निमित्ताने काही वाद उदभवू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.