आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासदार संजय राऊत यांनी भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर साखर कारखाना घोटाळा आरोप केला आहे. मात्र, याबाबत कोणतेच पुरावे दिले नाही; केवळ रिकामे विधाने करून उपयोग नाही असा टोला भाजप उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत लगावला.
राज्याच्या अर्थसंकल्पामुळे पुणे व पश्चिम महाराष्ट्राला मिळालेल्या लाभाची माहिती देण्यासाठी पुणे भाजपच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कुल यांनाच उत्तर द्यायचेय
माधव भंडारी म्हणाले, आमदार राहुल कुल हक्कभंग समिती अध्यक्ष असून त्यांच्यासमोर खासदार संजय राऊत यांना विधिमंडळ अपमान बाबत उत्तर द्यायचे आहे. त्यामुळे त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा राऊत यांनी याबाबत पुरावे द्यावे.
अध्यात्म - विकासाची सांगड
भंडारी, म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा संपूर्ण राज्यातील प्रत्येक घटकाच्या आशांना प्रतिसाद देणारा व त्यामुळे सर्वाना आनद देणारा अर्थसंकल्प आहे. भाजपा-शिवसेना युतीचे सरकार समाजाप्रती संवेदनशील सरकार असल्याचे या अर्थसंकल्पाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. अध्यात्म आणि विकासाची अनोखी सांगड घालणारा हा ‘पंचामृत अर्थसंकल्प’ आहे.
ठप्प विकासाला अर्थसंकल्पातून दिशा
माधव भंडारी म्हणाले, हा अर्थसंकल्प राज्याच्या भरकटलेल्या व ठप्प झालेल्या विकासाला पुन्हा योग्य दिशेला आणून चालना देणारा आहे. या अर्थसंकल्पातील विविध तरतुदी व प्रस्तावित योजना महाराष्ट्राला पुन्हा देशात अव्वल स्थानावर नेण्याऱ्या आहेत.राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जनभागीदारीतून अर्थसंकल्प सादर केला गेला हे या अर्थसंकल्पाचे सर्वात मोठे व महत्वाचे वैशिष्ट्य आहे. ४० हजार नागरिकांनी पाठवलेल्या सूचना विचारात घेऊन, त्यांच्या साह्याने तयार केलेला हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने लोकांना हवा असलेला अर्थसंकल्प ठरला आहे.
दिलासादायक तरतूद केल्या
माधव भंडारी म्हणाले, शेतकरी, महिला, नोकरदार, विद्यार्थी, अल्प मानधनात काम करणारे शिक्षणसेवक व अंगणवाडी सेविका-मदतनीस, छोटे व्यापारी, अन्य मागासवर्गिय, आदिवासी, दलित , मच्छिमार, निराधार नागरिक, दिव्यांग आदी समाजातील सर्व घटकांचा या अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. या प्रत्येक घटकासाठी अर्थसंकल्पात दिलासादायक तरतूद केली आहे.
जीवनमान बदलवणाऱ्या योजना
माधव भंडारी म्हणाले, शेतकऱ्यांना १२ हजार रुपये सन्मान निधी, एसटी प्रवासात महिलांना ५०% सवलत, अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मानधन, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ अशा अनेक नव्या तरतुदी या अर्थसंकल्पाद्वारे केल्या आहेत. विशेषत: पं.महाराष्ट्र व कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी लागू केलेली काजू फळ विकास योजना क्रांती घडविणारी आहे. लेक लाडकी योजनेतून मुलीला १८ वर्ष झाल्यावर ७५ हजार रुपये, महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण, इतर मागासवर्गीयांसाठी १० लाख घरांची मोदी आवास घरकुल योजना, आपला दवाखाना आदी योजना शोषित वंचित घटकांचे जीवनमान कायमस्वरूपी बदलून टाकणाऱ्या योजना आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.