आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसेवाला खून प्रकरण:महाकाल कांबळे अडकला पुणे पोलिसांच्या जाळ्यात, सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात रेकी केल्याचा संशय

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवचा साथीदार महाकाल ऊर्फ सौरभ हिरामण कांबळे याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे. नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

मुसेवाला खून प्रकरणात त्याचा प्रत्यक्ष हल्ल्याशी संबंध नसला तरी त्याने खुनापूर्वी रेकी केल्याचा संशय तपास यंत्रणांना असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. मंचर येथील सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले याच्याऑगस्ट २०२१ मधील खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष जाधवला आश्रय दिल्याप्रकरणी महाकाल कांबळेला अटक करण्यात आली असून, विशेष मकोका न्यायालयाने त्याला २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पूर्ववैमनस्यातून सोशल मीडियावर एकमेकांना ठार करण्याच्या धमक्यांचे स्टेटस ठेवल्याच्या कारणातून सराईत गुन्हेगार संतोष जाधवने ओंकार बाणखेलेचा गोळ्या झाडून खून केला होता. ही घटना एक ऑगस्ट २०२१ रोजी आंबेगावमधील एकलहरे गावात घडली होती. या प्रकरणी संतोष जाधवसह १२ जणांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यासह (मकोका) विविध कलमांनुसार मंचर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बाणखेलेचा खून केल्यानंतर संतोष जाधव फरार झाला होता. पोलिसांनी संतोषच्या अटकेसाठी वॉरंट काढले होते. तो फरार असताना महाकाल कांबळेने त्याला आश्रय दिला होता, अशी माहिती पोलिसांच्या पथकास मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला मंगळवारी संगमनेरजवळ ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

सर्व तपास यंत्रणांशी समन्वय साधून तपास सुरू
ओंकार बाणखेले खून प्रकरणातील फरार मुख्य आरोपी संतोष जाधवला आश्रय दिल्याप्रकरणी सौरभ ऊर्फ महाकाल कांबळेला अटक करण्यात आली आहे. मुसेवाला हत्या प्रकरणातील त्याच्या सहभागाबाबत आताच भाष्य करता येणार नाही. मात्र, पंजाब, राजस्थान, दिल्ली पोलिसांसह सर्व तपास यंत्रणांना या अटकेबाबत माहिती देण्यात आली असून, त्यांच्याशी समन्वय साधून सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे.
- डॉ. अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण पोलिस

बातम्या आणखी आहेत...