आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्बंध शिथिल करण्यावर भाष्य:पुण्यात दुकानांची वेळ सायंकाळी 7 पर्यंत वाढवून देण्यास मी सकारात्मक, मात्र अंतिम निर्णय सोमवारीच मुंबईतून जाहीर करणार - अजित पवार

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत असताना दिसत आहे. यामुळेच आता आता अनेकांकडून निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली जात आहे. याविषयी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले की, आम्ही त्याबाबतचा विचार करत आहोत, मुख्यमंत्री आणि इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ. सोमवारपासून 7 वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार करत आहोत. पण या बाबतचा अंतिम निर्णय सोमवारी मुंबईतूनच जाहीर होईल असेही पवारांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत याविषयावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, 'पुण्यात सोमवार पासून दुकानांची वेळ संध्याकाळी 7 वाढवून देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. मी स्वत: सकारात्मक आहे मात्र अंतिम निर्णय सोमवारीच मुंबईतून जाहीर करणार. तिसरी लाट ही यायलाच नको, मात्र तरीही प्रशासन सज्ज असणार आहे असेही अजित पवार म्हणाले.

आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी

कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासंदर्भात मंत्रालय स्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी आज स्पष्ट केले.

नमुना तपासणी मोहीम अधिक गतीमान करण्याच्या सूचना

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेता पुणे व पिंपरी चिंचवड महानगरांसह ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी. व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन प्रणाली व आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ आदींसह उपचार सुविधांचा सातत्याने आढावा घेण्यात यावा, तसेच ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेली धडक सर्वेक्षण व नमुना तपासणी मोहीम अधिक गतीमान करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

लसीकरण वाढीचा सातत्याने प्रयत्न

पुणे जिल्ह्याचा लसीकरणाचा वेग समाधानकारक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे जिल्ह्याने कोविड लसीकरणामध्ये 55 लाखाचा टप्पा पार केला ही समाधानाची बाब आहे, एका दिवसात एक लाखाहून अधीक लसीकरणही जिल्ह्याने पूर्ण केले आहे, मात्र लस उपलब्धता त्या तुलनेत कमी असल्याने लसीकरणाला गती देता येत नाही, लस उपलब्धतेसाठी सातत्याने राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत असून अधिकाधिक लसीकरण वाढीचा सातत्याने प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...