आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या साठ वर्षांपेक्षा अधिक काळ सामाजिक, साहित्यिक आणि वैचारिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा (अमेरिका) साहित्य जीवनगाैरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा परिवारच्या माध्यमातून प्रदीर्घ काळ समाजकार्याचे व्रत चालवणाऱ्या प्रेमाताई पुरव यांना फाउंडेशनचा समाजकार्य जीवनगाैरव सन्मान देण्यात येणार आहे. दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय फाउंडेशनच्या इतर विविध पुरस्कारांची घोषणाही सोमवारी करण्यात आली. साहित्य आणि समाजकार्य या क्षेत्रांत जाणीवपूर्वक दीर्घकाळ सकारात्मक योगदान देणाऱ्या व्रतस्थ लेखकांचा तसेच समाजकार्यकर्त्यांचा गौरव महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारांच्या निमित्ताने केला जातो, अशी माहिती फाउंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. साधना, मासूम संस्थांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
अन्य पुरस्कारांमध्ये रमेश अंधारे (अमरावती, ललित ग्रंथ पुरस्कार, ५० हजार रुपये), मुक्ता बाम (नाट्य पुरस्कार, ५० हजार रुपये), डॉ. सिसिलिया कार्व्हालो (वैचारिक लेखन, ५० हजार रुपये), सुरेश सावंत (कार्यकर्ता प्रबोधन पुरस्कार), सुनीता भोसले (अहमदनगर, कार्यकर्ता संघर्ष पुरस्कार), युवराज गटकळ (उस्मानाबाद, युवा पुरस्कार) यांचा समावेश आहे. फाउंडेशनच्या (अमेरिका) निवड समितीत विद्युल्लेखा अकलूजकर, शोभा चित्रे, सुनील देशमुख, रजनी केंदुरे यांचा समावेश होता. साहित्य, समाजकार्य विभागांसाठी भारतात विविध निवड समित्या होत्या. कोविड संकटाचे ढग पुन्हा दाटून आल्याने पुरस्कार प्रदान समारंभ यावर्षीही घेणे अवघड झाल्याचे संयोजकांनी सांगितले. याविषयी महिनाभरानंतर निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
अन्शुल छत्रपती यांना डाॅ. दाभाेलकर स्मृती पुरस्कार
डाॅ. नरेंद्र दाभाेलकर स्मृती पुरस्कार (१ लाख रुपये, स्मृतिचिन्ह) अन्शुल छत्रपती यांना, डिजिटल पत्रकारिता विशेष पुरस्कार ‘अक्षरनामा’चे राम जगताप यांना (१ लाख रुपये, स्मृतिचिन्ह) आणि वाङ्मय पुरस्कार पर्यावरणविषयक लेखनासाठी संतोष शिंत्रे (१ लाख रुपये, स्मृतिचिन्ह) यांना जाहीर झाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.