आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शिवरायांचा एक तरी गुण अंगी बाळगावा - पुरंदरे; महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा 100 वा वाढदिवस साजरा

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जयजयकार करतो, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक तरी गुण अंगी बाळगतो का? शिवाजी महाराजांनी दिलेला शब्द कधी मोडला नाही आणि दिलेली वेळ त्यांनी पाळली नाही असे कधीही झाले नाही. त्यांच्या या गुणाचे आचरण करता येईल असे मला वाटले. पण यामध्येही मी जेमतेम ६० टक्क्यांनी उत्तीर्ण झालो असेच मला वाटते, अशा शब्दांत वयाच्या शंभरीमध्ये पदार्पण केलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी गुरुवारी कबुली दिली.

गोवा मुक्तिसंग्रामातील पराक्रमावर आधारित चारुदत्त आफळे यांचे कीर्तन, दत्तोपंत हडप गुरुजी यांनी केलेले मंत्रपठण, नात राधा पुरंदरे-आगाशे आणि पल्लवी जाधव यांनी शंभर दिव्यांनी केलेले औक्षण अशा मराठमोळ्या वातावरणात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठान आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शताब्दी महोत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमास महापौर मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे उपस्थित होते.

पुरंदरे म्हणाले, ब्रिटनमध्ये विन्स्टन चर्चिल यांचे मला कोठेही स्मारक दिसले नाही. त्याबद्दल मी एकाला विचारले असता ‘चर्चिल आमच्या रक्तामध्ये असताना स्मारकाची गरजच काय?’ असा प्रतिप्रश्न मला करण्यात आला. असे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या रक्तामध्ये आहेत का? की केवळ जयजयकार करण्यातच आम्ही धन्यता मानणार? असा सवाल पुरंदरे यांनी उपस्थित केला.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या शुभेच्छा
‘पायावर डोके ठेवून नमस्कार करते आणि तुमची तब्येत उत्तम राहो अशी प्रार्थना करते,’ अशा शब्दांत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी दूरध्वनीद्वारे पुरंदरे यांना शुभेच्छा दिल्या. ‘तुम्ही आम्हाला ११० वर्षे असावे असे वाटते. म्हणजे तोपर्यंत मीही असेन,’ अशी भावना त्यांनी प्रदर्शित केली. या वेळी मनसेप्रमुख राज ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. या वेळी त्यांनी पुरंदरे यांचा सत्कार केला. पुरंदरे यांना राज्यभरातून अनेक मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी आले होते.

बातम्या आणखी आहेत...