आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटाळा:राज्यातील भरती परीक्षा घोटाळ्यात औरंगाबाद, जालन्याचे रॅकेट सक्रिय; हायटेक डमी गँग रॅकेटचा पर्दाफाश करण्याची गरज

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील तलाठी, वनरक्षक, आराेग्य, पाेलिस, नगरविकास, म्हाडा, क्लार्क, टीईटी अशा विविध भरती परीक्षांच्या घोटाळ्यात आैरंगाबाद, जालना, धुळे परिसरातीलच ‘विशिष्ट’ रॅकेट सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.

चीनमधून अत्याधुनिक दर्जाची ब्ल्यूटूथ, इलेक्ट्राॅनिक चिप, गाेपनीय कॅमेरे मागवून त्याआधारे परीक्षेत काॅपी करणारी हायटेक डमी गँग सक्रिय आहे. त्याचसाेबत परीक्षेचा डमी विद्यार्थी बसवून त्यांना पास करणारी व पेपरफुटी प्रकरणात एजंटची भूमिका निभावणाऱ्या या रॅकेटची विशेष चाैकशी समिती नेमून (एसआयटी) सखाेल चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीच्या वतीने नागपूर खंडपीठात याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

मागील सरकारच्या काळात सन २०१७ मध्ये शासकीय वर्ग ३ व ४ ची पदे ही महापरीक्षा पाेर्टलच्या माध्यमातून आॅनलाइन परीक्षेद्वारे घेतल्या जातील, असे ठरवण्यात आले. त्यानंतर यूएसपी ग्लाेबल कंपनीला याबाबत टेंडर देण्यात आले, परंतु हायटेक डमी गँग रॅकेटला राेखू शकणारी सक्षम यंत्रणा त्यांच्याकडे नव्हती. कानात दिसू शकणार नाही अशा प्रकारचे ब्ल्यूटूथ व एटीएम कार्डच्या इलेक्ट्राॅनिक चिप व शर्टच्या बटणाला गाेपनीय कॅमेरा याद्वारे परीक्षेचा पेपर सुरू झाल्यानंतर त्याचे अल्पावधीत फाेटाे काढून ते बाहेरील व्यक्तीस पाठवण्यात येत आहे. बाहेरील व्यक्ती क्लासचालक, तज्ज्ञांना पैसे देऊन त्यांच्याकडून संबंधित पेपर साेडवला जातो. त्याची उत्तरे ब्ल्यूटूथद्वारे फाेनवर सांगून पेपर साेडवण्यात येताे. त्याचप्रमाणे परीक्षेच्या उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांच्या जागी हाॅल तिकीटमध्ये फेरफार करून डमी विद्यार्थी बसवून परीक्षा देण्यात येते. अशा प्रकारचा प्रकार सर्वप्रथम अहमदनगर येथील तलाठी परीक्षेदरम्यान उघडकीस आला. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना परीक्षेबाबत संशयानंतर त्यांनी अहवाल तयार करून १२ डमी विद्यार्थी असल्याचे स्पष्ट केले.

प्रत्येक परीक्षेत ५० ते १०० संशयित
एमपीएससी समन्वय समितीचा सचिव नीलेश गायकवाड म्हणाला, हायटेक डमी टाेळी रॅकेट आैरंगाबाद जिल्ह्यात बदनापूर, वैजापूर आणि जालना जिल्ह्यात अंबड येथे सुरू असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील सहा ते सात भरती परीक्षांत याच भागातील विशिष्ट उमेदवार पास हाेत असल्याचे दिसून आले. प्रत्येक परीक्षेत ५० ते १०० संशयित विद्यार्थी पास झाल्याचे दिसून आले असून त्याची माहिती न्यायालयास देण्यात आली.

आरोग्य भरती गैरव्यवहारातील पहिला संशयित अंबडचा विजय मुऱ्हाडे
आराेग्य भरती गैरव्यवहारात विजय मुऱ्हाडे (अंबड, जालना) हा संशयित सर्वप्रथम ताब्यात आला असून परीक्षेच्या दिवशी त्याला आधीच पेपर मिळाल्याचे स्पष्ट झाले. खासगी कंपनीकडील पेपरचे काॅन्ट्रक्ट रद्द करून एमपीएससीमार्फत परीक्षा घेण्यात याव्यात, एसआयटी नेमून गैरव्यवहाराची चाैकशी करावी, न्यासा कंपनीला काळ्या यादीत टाकून आराेग्य भरती प्रकरणातील घोटाळ्याचा तपास करण्यात यावा या आमच्या मागण्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...