आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरारी:जगात साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर, 100 वर्षांतील सर्वाधिक साखर गाळप

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील २१० खासगी आणि सार्वजनिक साखर कारखान्यांनी मिळून १०५३ लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप यंदा केले आहे. ९.५० लाख टन साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता निर्माण झालेली असून २० हजार टन गाळप क्षमता साखर कारखाने वाढत आहे. जगात साखर उत्पादनात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यानंतर इतर देशांचा नंबर लागतो. आतापर्यंत राज्यातील मागील शंभर वर्षांतील सर्वाधिक गाळप हंगाम यंदाच्या वर्षी पार पडल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम ३ महिन्यांवर आला असून कोणाचाही ऊस गाळपसाठी शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचेही ते म्हणाले.

गायकवाड म्हणाले, गाळप क्षमता वाढली तरी सरासरी साखरेचा उतारा कमी झालेला आहे. खोडवा पीक, सातत्याने अवकाळी पाऊस यामुळे उसाच्या प्रतिहेक्टरी उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट निर्माण झाली आहे. मागील हंगाम सरासरी १७३ दिवसांचा होता. मात्र, यंदाचा गाळप हंगाम सरासरी १२१ दिवसांचा राहिलेला आहे. ५२ दिवस कमी झाल्याने त्याचा तोटा कारखान्यांना निर्माण झाला. राज्यातील २२ जिल्ह्यांत उसाचे क्षेत्र वाढत असून अवकाळी पाऊस-गारपीट यातही ऊस कायम राहिल्याने कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई उसाला द्यावी लागली नाही. दुष्काळी भागातही ऊस वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. एफआरपीवरही आयुक्तालयाने नियंत्रण ठेवले असून एकूण ३३ हजार २७८ कोटी एफआरपीपैकी ९६% एफआरपीचे वाटप आतापर्यंत करण्यात आलेले आहे.

बारामती ॲग्रो सहकारी कारखान्याला साडेचार लाख रुपयांचा दंड : अडचणीत आलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने आतापर्यंत २४ कारखान्यांचे पुनरुज्जीवन केले. त्यांची गाळप क्षमता चाचणी घेण्यात आली असून पुढील वर्षी सक्षमपणे ते कार्यरत राहतील. गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी गाळप सुरू केल्याने आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो सहकारी कारखान्याला साडेचार लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. अद्याप ४० लायसन्स घेतलेले आणि बंद कारखाने आशी परिस्थिती आहे. नव्याने ५ कारखान्यांचा प्रस्ताव आलेला आहे.

ब्राझील वगळता इतर देश महाराष्ट्राच्या पाठीमागे
साखरेचा उतारा यंदा सरासरी ११.२५ टक्के राहिलेला असून आतापर्यंतचे सर्वाधिक साखर उत्पादन झाले. महाराष्ट्राची साखरेची मागणी ३५ लाख मेट्रिक टन असून महाराष्ट्र १०५ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन करतो. देशातून ६० लाख टन साखर निर्यात केली जाते. त्यापैकी २३ लाख टन साखर महाराष्ट्र निर्यात करतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर ३८ रुपयांचा दर निर्यातीस मिळालेला असून त्या माध्यमातून ८७०० कोटी महाराष्ट्राला मिळाले. साखर उत्पादनात जगात भारत पहिल्या क्रमांकावर असून ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून त्यानंतर रशिया, चीन, थायलंड आदी देशांचा क्रमांक लागतो.

इथेनॉल निर्मितीकडे वाढता कल
मागील ऊस गाळप हंगामात १२ लाख टन साखर इथेनॉलकडे वळालेली होती. मात्र, यंदा हे प्रमाण १६ लाख टनापर्यंत वाढलेले आहे. २२६ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती गत हंगामात होती. यंदा ती २४४ कोटींपर्यंत वाढली. पुढील वर्षीच्या अखेरपर्यंत त्याचे प्रमाण ३०० कोटींवर जाईल अशी अपेक्षा आहे. साखरेचे वाढते उत्पादन पाहता कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिले असून ५ कारखाने पुढील हंगामात केवळ इथेनॉलवर भर देणार आहेत.